पिंप्री राजा : अधिग्रहित विहिरीचे बिल काढण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी रहाळपट्टी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच पूनमचंद रूपा चव्हाण यांनी लाच घेतली होती. त्यामुळे सरपंचाला अपात्र करण्याची कारवाई अपर विभागीय आयुक्त यांनी केली आहे.
तक्रारदार कुंडलिक मानसिंग चव्हाण यांच्याकडे गतवर्षी सात हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना सरपंच पूनमचंद चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रकमेसह पकडले होते. या प्रकरणाची सुनावणी अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कोर्टात सुरू होती. आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या प्रकरणी एक महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांचे पत्र व संबंधित अहवाल कोर्टात सादर केला.
प्रकरणात अपर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्या कोर्टाने पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रस्ताव स्वीकारत पूनमचंद रूपा चव्हाण सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रहाळपट्टी यांच्यावर गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवत त्यांना पुढील कालावधीसाठी सरपंच या पदावरून अपात्र ठरविले आहे.