औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय विधी विद्यार्थी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या यंदाच्या फिलिप जेसेप आंतरराष्ट्रीय कायदा अभिरूप न्यायालय स्पर्धेत येथील राहुल देसरडा यास उत्कृष्ट वादविवादपटू (ओरॉलिस्ट) ठरला. जगभरातील ५९१ स्पर्धकांपैकी १६ व्या क्रमांकाचा उत्कृष्ट वक्ता म्हणून निवडला गेला. राहुल देसरडा हा प्रा. एच. एम. देसरडा यांचा नातू आहे.
राहुल हा जिंदल ग्लोबल लॉ स्कूलमध्ये शिक्षण घेत असून त्याने या स्कूलचे स्पर्धेत नेतृत्व केले होते. या स्पर्धेत ९० देशातील ५७४ टीमने तब्बल २०२३ फेऱ्यांमध्ये भाग घेतला होता. ३ हजार तास चाललेल्या या स्पर्धेचे परीक्षण जगभरातील ख्यातनाम विधीतज्ज्ञ, न्यायाधीश व प्राध्यापकांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली. राहुलने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले असून तो सध्या ॲड. प्रशांत भूषण, कॉलीन ग्रोनसाॅल्हवेस तसेच अमेरिका, युरोप आदींसह विविध ठिकाणच्या विधीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.