औरंगाबाद : सध्या सुरू असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणूक रणधुमाळीत ‘भारत जोडो’ यात्रेतून ‘ब्रेक’ घेत काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सोमवारी भाग घेतला. सुरत आणि राजकोट येथील कॉंग्रेसच्या प्रचारसभा आटोपून ते रात्री औरंगाबाद मुक्कामी आले.
मंगळवारी सकाळी ७ वा. ते ‘भारत जोडो’ यात्रेकडे रवाना झाले. ही यात्रा सध्या मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास राहुल गांधी यांचे औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. येथून ते लगेच विमानाने सुरतकडे रवाना झाले. तेथील व राजकोट येथील प्रचारसभा आटोपून ते पुन्हा सायंकाळी सातच्या सुमारास चिकलठाणा विमानतळावर आले. त्यांच्यासमवेत के. सी. वेणुगोपालही आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोकसिंह गेहलोत हे सध्या गुजरातमध्ये प्रचार दौऱ्यावर आहेत. सायंकाळी राहुल गांधी यांच्यासमवेत ते आले आणि चार्टर विमानाने लगेच गुजरातकडे रवाना झाले.
खा. राहुल गांधी यांचा मुक्काम रामा हाॅटेलमध्ये राहिला. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ, विलासबापू औताडे, डॉ. जफरखान, अशोक सायन्ना, जगन्नाथ काळे, डॉ. पवन डोंगरे, जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा हेमा पाटील, दीपाली मिसाळ, उज्ज्वला दत्त, किरण पाटील डोणगावकर, ॲड. सय्यद अक्रम, इब्राहिम पठाण, खालेद पठाण, शेख अथर, प्रकाश वाघमारे, गौरव जैस्वाल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाटेत राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी मुुकुंदवाडी येथे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. परंतु त्याठिकाणी ते थांबलेच नाहीत.