औरंगाबाद : शिवजयंती मिरवणुकीत हातातील झेंडा हिसकावणाऱ्या राहुल भोसलेच्या कानाखाली श्रीकांत शिंदेने लगावल्यानंतर राहुलने घरी जाऊन चाकू आणला आणि साथीदारांसह श्रीकांतला गाठून त्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, मुख्य आरोपी राहुल भोसलेला पुण्यातून, तर त्याच्या अन्य दोन साथीदारांना शहराच्या वेगवेगळ्या भागांतून पोलिसांनी पकडले. अटकेतील आरोपींना न्यायालयाने २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मुख्य आरोपी राहुल सिद्धेश्वर भोसले (रा. भारतनगर, गारखेडा परिसर), छोटू ऊर्फ विजय शिवाजी वैद्य (रा. बजरंगनगर, चिकलठाणा परिसर) आणि ऋषिकेश बाळू काळवणे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आणखी एक आरोपी नवनाथ शेळके (रा. भारतनगर) यास पुण्यातील नांदेड सिटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर श्रीकांतच्या खुनाचे कारण समोर आले आहे. १९ फेब्रुवारी रोजी रात्री शिवनेरी चौकातून निघालेली शिवजयंती मिरवणूक पुंडलिकनगर गल्ली नंबर ९ समोर होती. तेव्हा आरोपी राहुलने श्रीकांतच्या हातातील झेंडा हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या वादातून श्रीकांतने राहुलच्या कानाखाली लगावली. यावेळी तुला दाखवितो, असे म्हणून राहुल घरी गेला आणि त्याने चाकू आणला. विजयनगर येथे असलेल्या छोटू, ऋषिकेश, नवनाथ यांना फोन करून मिरवणुकीत भांडण झाल्याचे सांगून पुंडलिकनगर येथे बोलावून घेतले.
तोपर्यंत मिरवणूक हनुमाननगर चौकाकडून पुंडलिकनगर रस्त्यावर होती. यावेळी श्रीकांतला गाठून आरोपींनी त्याला मारहाण केली, तर राहुलने त्याच्या छातीत चाकू खुपसून त्याला ठार केले. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, विकास खटके, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चोरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे यांनी आरोपींना अटक केली. दरम्यान, राहुल सिद्धेश्वर भोसले, विजय ऊर्फ छोटू शिवाजी वैद्य आणि ऋषिकेश बाळू काळवणे या तिघांना शुक्रवारी (दि.२१) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मुख्य आरोपीला पुण्यात मध्यरात्री अटकघटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींपैकी छोटू वैद्यला करमाड परिसरात गुरुवारी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मुख्य आरोपी राहुल पुणे येथे गेल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर आरोपी ऋषिकेशला रात्री उशिरा ताब्यात घेतले. राहुलला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रात्रीच पुणे येथे रवाना केले होते. मध्यरात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास राहुलने जालना येथील एका गुन्हेगाराकडे पैशाची मागणी केली होती. जालना येथील त्या गुन्हेगाराने पैसे देण्याची तयारी दर्शविली आणि एका जणामार्फत तुला पैसे पाठवितो, असे कळविल्याचे पोलिसांना समजले. ठरलेल्या ठिकाणी राहुल पैसे नेण्यासाठी येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.