कन्नड - पंचायत समितीच्या सभापतीपदी रायभान जाधव विकास आघाडीचे आप्पाराव घुगे तर उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या डॉ. नयना तायडे यांची निवड झाली.
सभापतीपदासाठी काँग्रेसच्या रुबिना कुरेशी यांनी तर आघाडीचे आप्पाराव घुगे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. उपसभापती पदासाठी भाजपच्या डॉक्टर नयना तायडे व शिवसेनेच्या मुन्नी पवार यांनी अर्ज दाखल केले होते. मतदाना अंती सभापतीपदासाठीचे उमेदवार आप्पाराव घुगे यांना व उपसभापती पदाच्या उमेदवार डॉ. नयना तायडे यांना प्रत्येकी १० तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सभापती पदाच्या उमेदवार रुबिनाबी कुरेशी व उपसभापती पदाच्या उमेदवार मुन्नी पवार यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते तर सहाय्यक म्हणून तहसीलदार संजय वारकड आणि गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी काम पाहिले.
निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, चिटणीस डॉ. संजय गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, खरेदी-विक्री संघाचे सभापती सुरेश डोळस, संचालक मेहेगावचे सरपंच पांडुरंग घुगे, राजेंद्र गव्हाणे, रमेश नागरे, मनोज देशमुख, अजबसिंग राजपूत, भगवान कोल्हे आदींनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला.