औरंगाबाद : महावीर चौकात रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटीच्या दोन घटना घडल्या. बारावीच्या शिकवणीला जालना जिल्ह्यातून आलेल्या एका मुलाला क्रांतीचौकाजवळ धाक दाखवून लुटले. तसेच रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ मेंढपाळाकडील मोबाईल व रोकड हिसकावून घेण्यात आली. या दोन्ही प्रकरणांची क्रांतीचौक ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. महावीर चौकात रविवारी पहाटे २.३० वाजता एका रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून पाच जणांनी लुटले होते. दुसऱ्या रिक्षाचालकांना हा प्रकार समजताच त्यांनी एका लुटारूला पकडून क्रांतीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तसेच गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करून सिडको बसस्थानक परिसरात तिघांना अटक केली होती. यातील एक आरोपी फरार आहे. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता कृष्णा नारायण मठपती (रा. गोंदी, ता. अंबड, जि. जालना. ह. मु. उल्कानगरी, विजयनगर) या मुलाला लुटले. तो बारावीच्या शिकवणीसाठी पंधरा दिवसांपूर्वीच औरंगाबादेत आला आहे. पैठण गेटकडून क्रांतीचौकात पायी आल्यावर त्याला रिक्षाने विजयनगरकडे जायचे होते. क्रांतीचौकात एकाने त्याला ‘चल आपण सोबत रिक्षाने जाऊ’ म्हणून पेट्रोलपंपाच्या बाजूला मोकळ्या जागेत निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि मारहाण करण्याचा धाक दाखवून त्याच्याकडील पाच हजार रुपये रोकड आणि पाच हजारांचा मोबाईल, असा दहा हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणी कृष्णा मठपती याच्या फिर्यादीवरून क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार धोंडे करीत आहेत.
शहरात लुटारूंचा सुळसुळाट
By admin | Published: April 12, 2016 12:13 AM