औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील कर्मचारी असोसिएशनच्या कार्यालयातील जुगार अड्ड्यावर उस्मानपुरा पोलिसांनी रात्री धाड टाकली. तेथे जुगार खेळणाऱ्या ३ निवृत्त फौजदार, रेल्वे अधिकाऱ्यासह ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण २ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रेल्वेच्या पार्सल विभागाचे अधिकारी रवी सूर्यकांत किवळे, निवृत्त फौजदार चंद्रभान तान्हाजी बागूल, बाळू दगडू शिंदे, प्रकाश विश्वनाथ वानखेडे, व्यायामशाळा प्रशिक्षक समीर जफर कुरेशी, आरेफ रशीद कुरेशी, किशोर लक्ष्मण धनेधर, मनोज भास्कर हिरे, तुषार राजू पवार, बाबासाहेब शेकुजी निकम आणि भाऊसाहेब चंद्रकांत बागूल अशी अटकेतील जुगाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि कर्मचारी सातदिवे, प्रल्हाद ठोंबरे, सय्यद अश्रफ, संजयसिंग डोभाळ, वाहनचालक सानप हे गस्तीवर असताना रेल्वेस्टेशनातील जुगार अड्डा रंगल्याची माहिती खबऱ्याने दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रात्री तेथे धाड टाकली असता आरोपी गोलाकार बसून पैशावर जुगार खेळत असल्याचे दिसले. घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी जुगाऱ्यांना अटक केली.