औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डिसेंबरमध्ये औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याची रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे. दौऱ्यात कोणत्याही त्रुटी निघणार नाहीत, यासाठी ‘दमरे’च्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी सोमवारी रेल्वेस्टेशनवर पाहणी करून विविध सूचना केल्या.
‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी दौरा आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशनवर विविध कामांचा धडाका सध्या सुरूआहे. याची पाहणी करण्यासाठी त्रिकालज्ञ राभा सोमवारी दुपारी दीड वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाले. ेस्टेशनच्या नव्या इमारतीचे रंगकाम, फरशांची कामे, स्वच्छतागृहातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना कामासंदर्भात विविध सूचना करीत लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे त्यांनी बजावले.
स्टेशन परिसराची पाहणी करताना राभा यांनी अस्वच्छतेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, पोलीस निरीक्षक दिलीप साबळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी रेल्वेत सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आॅल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनने निवेदनाद्वारे राभा यांच्याकडे केली.
दुसऱ्या टप्प्यासाठी प्रयत्नशीलच्रेल्वे प्रशासनातर्फे औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा विकास करण्यास प्राधान्य आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक येतात. स्टेशनविषयी कौतुक करतात; परंतु अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त करतात. रेल्वे प्रशासन स्वच्छतेची जबाबदारी निभावते. मात्र, प्रवाशांनीही स्वच्छतेला प्राधान्य दिले, तर रेल्वेस्टेशनचा विकास सार्थक होईल. रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी प्रयत्नशील असून डिझाईन अंतिम केले जात आहे, असे त्रिकालज्ञ राभा म्हणाले.