लासूर स्टेशन : कृषी कायदे रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी किसान सभा व लालबावटा शेतमजूर युनियनने रेल्वे रोको आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. जनशताब्दी एक्सप्रेस अडविणाऱ्या ४९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लासूर स्टेशनवर संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनास प्रतिसाद देत आंदोलन करण्यात आले.
गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासून किसान सभा व शेतमजूर युनियनच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर निदर्शनास सुरुवात केली होती. जनशताब्दी एक्सप्रेस लासूर स्टेशनला येताच तिच्यासमोर रूळावरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. जनशताब्दी एक्सप्रेस सुटण्याची वेळ निघून गेल्यानंतरही कार्यकर्ते त्या ठिकाणाहून हलले नाही. यादरम्यान बळाचा वापर करून पोलिसांनी आंदोलकांना हटवले. लासूर स्टेशन, गाजगाव, खादगाव, देरडा, धामोरी, कोपरगाव, गोळवाडी, दहेगाव, सिंधी सिरजगाव, कलीम टाकळी आदी गावातील किसान सभा व शेतमजूर युनियनचे कार्यकर्ते या रेल्वे रोको आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन करणाऱ्या ४९ जणांना रेल्वे व शिल्लेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रा. राम बाहेती, किसान सभेचे जिल्हा सचिव कैलास कांबळे, जिल्हा धरणग्रस्त समितीचे भाऊसाहेब शिंदे, विलास शेंगुळे, सुरेश शेंगुळे, दौलतराव मोहिते, दत्तू काळवणे, रूपचंद हिवाळे, जालिंदर धुमाळ, ज्ञानेश्वर गवळी, मच्छिंद्र धुमाळ, फकीरचंद जाधव, राजू जाधव, किशोर पवार, लक्ष्मणराव तुपे आदी उपस्थित होते.
--- या मागण्यासाठी आंदोलन --
केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यासह किमान आधारभूत भावाचा नवीन कायदा करा, राशन व्यवस्था वाचवा, दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवरील दडपशाही थांबवा आदी मागण्यांसाठी हे देशव्यापी आंदोलन करण्यात आले.
180221\img_20210218_153527_1.jpg
लासून स्टेशन आंदोलन