बाबासाहेब धुमाळ
वैजापूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या वैजापूर तालुक्यातील रोटेगाव रेल्वेस्थानकावर शेतीमालाची ने आण करण्यासाठी मालधक्का (रॅक पॉईंट) उभारण्यास तत्वत: मंजुरी मिळाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर प्राथमिक स्तरावरील कामांना वेग मिळाल्याने शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. मालधक्क्याच्या माध्यमातून तालुक्यातील मका, कपाशी, कांदा या नगदी पिकांसह फुलांचा मालही परराज्यात जाण्यास मदत होणार आहे. एकंदरीत तालुक्यासाठी शेतीमालाची मोठी बाजारपेठ विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशात लावलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेची चाकेही थांबली होती. परंतु मागील काही महिन्यांपासून अनल़ॉकची प्रक्रिया सुरू झाली. तसा रेल्वे विभागही गतीने कामाला लागला. रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी विभागाच्या वतीने रोटेगाव येथील मालधक्क्याच्या कामाबाबत पुढाकार घेतला गेला. वैजापूर शहरापासून केवळ तीन किमी. अंतरावर असलेल्या रोटेगावच्या मालधक्क्यासाठी वैजापूर कृउबा समितीचा पाठपुरावा सुरूच होता.
ऑक्टोबर २०२० मध्ये द.म.रे. विभागाच्या औरंगाबादेतील निरीक्षक राजीव रॉय, अभियंता विनोदकुमार आर्या, आशुतोष कुमार, वाहतूक निरीक्षक ए. सी. निलम, हरीष कुमार वरिष्ठ अभियंता (औरंगाबाद), अभियंता प्रशांत काकुष्ठा या अधिकाऱ्यांनी रोटेगाव येथे जागेची पाहणी केली. जुन्या स्थानकावर रॅक पॉईंट तयार केला जाणार आहे. यावेळी कृउबा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी विविधांगी चर्चा झाल्यानंतर मालधक्क्यासाठी सकारात्मकता दर्शविली. त्यानंतर येथील कामालाही गती दिली गेली. स्वच्छता करणे, नवीन रुटसाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले.
----
जुन्या प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र लाईन
शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र रस्ता, माल साठवण्यासाठी गोडाऊन आदी कामे करण्यात येणार आहेत. ही कामे झाल्यानंतर रोटेगाव मुख्य स्थानकासोबतच शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र रॅक पॉइंट विकसित होणार आहे. जुन्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र रेल्वे लाईन टाकून (ट्रॅक) तिथेच कांद्याचे वॅगन भरण्याची व्यवस्था असणार आहे.
----
कांदा मार्केटला अच्छे दिन
तालुक्यात मका व कपाशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून बाजार समिती व तालुका खरेदी विक्री संघातर्फे या मालाची शेतकऱ्यांकडून शासकीय हमी भावाने खरेदी केली जाते. कृउबा समितीच्या घायगाव शिवारातील कांदा मार्केटमध्ये कांद्याची खरेदी केली जाते. व्यापाऱ्यांकडून ट्रकद्वारे परराज्यात कांद्याची वाहतूक केली जाते. मात्र आता रेल्वेच्या मालधक्क्यामुळे शेतकऱ्यांना रेल्वेच्या वॅगनद्वारे कमी पैशात परराज्यात शेती माल पाठवणे शक्य होणार असल्याने कांदा मार्केटला अच्छे दिन येणार आहेत.
----
सुमारे २५ हजार क्विंटलची क्षमता
एका रॅकमध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस हजार क्विंटल माल नेण्याची क्षमता असणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतीमाल एकाच वेळी पैसा व वेळेची बचत करुन परराज्यात पाठविता येणार आहे. वैजापुरातील मुख्य मार्केटसह शिऊर येथील उपबाजार, गंगापूर, लासूर स्टेशन, येवला येथील व्यापाऱ्यांनाही हा मालधक्का उपयुक्त ठरणार आहे.
----
एका दृष्टिक्षेपात मालधक्क्याचा प्रवास
१) तत्वत: मान्यता मिळाल्याने तालुक्यातील शेतीमालाला चांगलाच उठाव मिळणार आहे.
२) दरवर्षी बाजार समितीला कांदा, मका, कपाशीसह अन्य भुसार मालाची किती आवक होते. याची आकडेवारी रेल्वे विभागाने कृउबा समितीकडून मागितली आहे.
३) शेतीमालाशिवाय सिमेंट, स्टील, लोखंड आदी वस्तूंची ने-आण करणेही शक्य होणार आहे.
४) औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्यातील पहिला मालधक्का ठरणार आहे.
----