औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनवर स्वच्छतागृहाच्या वापरासाठी महिला प्रवाशांकडून सर्रास दोन ते सात रुपयांची वसुली केली जात असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पैशांची वसुली होत असल्याची खात्री करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनीच स्ंिटग आॅपरेशन केले. यावेळी एकदा नव्हे तीन वेळा पैशांची वसुली करताना निदर्शनास आल्याने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.रेल्वेस्टेशनवर महिला प्रवाशांसाठी शौचालयाच्या वापरासाठी २ रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे, तर लघुशंकागृहाची सुविधा मोफत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात प्रत्येक महिलेकडून या ठिकाणी सरसकट २ ते ७ रुपयांची वसुली केली जात आहे; परंतु शौचालय आणि लघुशंकागृह या दोन्हीची सेवा महिलांसाठी मोफत असण्याची मागणी होत आहे. एसटी महामंडळाच्या बसस्थानकांसह विविध सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहाची सुविधा पुरविली जाते. दक्षिण मध्य रेल्वेकडून मात्र या सुविधेला बगल दिली जात आहे. रेल्वेस्टेशनवर स्वच्छतागृहाच्या वापरासाठी आर्थिक अडवणूक होत असल्याने महिला प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रेल्वेस्टेशनवर सुरू असलेल्या या प्रकाराविषयी १९ एप्रिल रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले.लघुशंकागृहाची सुविधा मोफत असताना महिलांकडून पैसे आकारले जात असल्याच्या प्रकाराची खात्री करण्यासाठी स्वत: विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए.के. सिन्हा यांनी पडताळणी केली. त्यासाठी त्यांनी रेल्वेस्टेशनवरील स्वच्छतागृहाजवळ एका व्यक्तीला तैनात केले आणि पैशांची वसुली होत असल्याबाबत खात्री करण्याची सूचना केली. या व्यक्तीसमोर एकदा नव्हे, तर तीन वेळा स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्याने पैसे आकारले. ही बाब सदर व्यक्तीने तात्काळ सिन्हा यांना कळविली. त्यानंतर सिन्हा यांनी तात्काळ पाऊल उचलत स्वच्छतागृहाच्या ठेकेदारावर ५०० रुपयाची दंडात्मक कारवाई केली. यापुढे पैसे आकारल्यास सक्त कारवाई करण्याची ताकीदही दिली.
रेल्वे व्यवस्थापकांनी केले ‘स्टिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2016 12:36 AM