- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : झारखंडला रवाना होण्यासाठी रेल्वेला सिग्नल मिळतो आणि रेल्वे हळू हळू रवाना होण्यास सुरुवात होते. त्याच वेळी चार श्रमिक रेलवेस्टशनवर धावत येतात. ही बाब लक्षात येताच धावती रेल्वे थांबवली जाते. हे श्रमिक मोठ्या आनंदाने रेल्वेत बसतात आणि गावाकडे रवाना होतात.
औरंगाबादहून मंगळवारी झारखंडसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेने शहरात विविध कंपनी आणि विविध ठिकाणी काम करणारे मजूर, कामगार रवाना झाले. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी रेल्वेस्टेशनला भेट देऊन कामगारांशी संवाद साधला. ही रेल्वे ११.४५ वाजता रवाना करण्यात आली. परंतु त्याच वेळी चार कामगार हातात समान घेऊन रेल्वेच्या मागे धावत असल्याचे निदर्शनास पडले. पोलीस अधिकारी, रेल्वे अधिकारी यांनी तात्काळ रेल्वे थांबविण्याची सूचना केली. ही रेल्वे थांबताच हे कामगार रेल्वेत बसले. सर्वांचे आभार मानत ते झारखंडला रवाना झाले.