पैठण : परतीच्या पावसाने पैठण तालुक्यात ६ सप्टेंबरपासून हजेरी लावली असून गेल्या आठ दिवसांपासून तालुकाभर कोठे ना कोठे तो पडत असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारी पैठण व आडूळ येथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.पैठण तालुक्यात पावसाने अवकृपा केल्याने रबी व खरीप दोन्ही हंगामातील पिके धोक्यात आहेत़ अशातच पावसाची आशा मावळली असताना परतीच्या पावसाने तालुक्याला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे़ ६ सप्टेंबर रोजी आडूळ येथे २१ मि़मी. पावसाची नोंद झाली आहे़ बिडकीन ९ मि़मी., तर दि़ ९ रोजी विहामांडवा ६० मि़मी. पावसाची नोंद झाली़ १० रोजी पैठण १०, पिंपळवाडी १०, नांदर १२ व विहामांडवा २५ मि़मी. पाऊस झाला़ १२ सप्टेंबर रोजी पैठण येथे ५ मि़मी. पावसाची नोंद झाली, तर पिंपळवाडी ८, बिडकीन ६, नांदर १०, विहामांडवा १२, पाचोड २५, आडूळ १२, बिडकीन १८, लोहगाव १२, ढोरकीन १८ मि़मी. अशी पावसाची नोंद झाली. परतीचा पाऊस पडता झाल्याने किमान जनावरांसाठी हिरवे वैरण उपलब्ध होण्याची आशा बळीराजास लागली आहे.सोयगाव : सोयगाव तालुक्यातील मूर्ती गावातील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. भागचंद लकीचंद चव्हाण (३७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे़ ४मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याची गट नं. १०२ मध्ये शेती असून, दि. १३ रविवार रोजी या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तेव्हा सदर शेतकरी शेतीत काम करीत असताना वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती सोयगावचे तहसीलदार नरसिंग सोनवणे यांना येथील ग्रामस्थांनी दिली. तहसीलदारांनी तलाठी डी.व्ही. गायकवाड यांना घटनास्थळी पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सोमवारी (दि. १४) घटनास्थळ पंचनामा करण्यात आला.४शेतकरी भागचंद चव्हाण यांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ नैसर्गिक आपत्तीमुळे मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नैसर्गिक आपत्ती घटनाअंतर्गत त्वरित ३ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी विविध राजकीय पक्ष संघटनांच्या स्थानिक पुढाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
पैठण, आडूळमध्ये पावसाची हजेरी
By admin | Published: September 14, 2015 11:59 PM