छत्रपती संभाजीनगर : पावसाळा हा सर्वांना आल्हाददायक वाटतो. मात्र, अल्हाददायक वातावरणाबरोबरच अनेक आजारांचा धोका पावसाळ्यातच वाढत असतो. ओलसर वातावरणामुळे जीवजंतूच्या वाढीला हातभार लागतो. यामुळे मुलांना विविध इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात मुलांच्या आरोग्यासाठी पालकांनी पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
पावसाळ्यात त्वचा तेलकट आणि ओलसर होते. त्यामुळे हवेतील धूळ, बॅक्टेरिया त्वचेवर चिकटतात. त्यातून बुरशीजन्य आजारांची लागण होण्याची भीती वाढते. पावसाळ्यात वातावरणातील बदलाचा विशेषत: मुलांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. वातावरणातील प्रदूषकांमुळेही मुले आजारी पडण्याची शक्यता वाढते.
पावसाळ्यात मुलांना हा धोकासर्दी-ताप : पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, ताप हा त्रास सर्वाधिक भेडसावतो. प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या मुलांची पालकांनी काळजी घ्यावी.पोटदुखी : उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन किंवा दूषित अन्न, अस्वच्छ परिसरामुळे पोटाचे आजार होऊ शकतात.खोकला : तापमानात अचानक होणारे बदल श्वसनविकारास कारणीभूत जंतूंचा प्रसार वाढवू शकतात. मुलांना खोकला, घसा खवखवणे, शिंका येणे, छातीत घरघर आणि यासारख्या श्वसनाशी संबंधित विविध समस्या उद्भवू शकतात.
काय काळजी घ्याल?आहार : मुलांना ताजे आणि गरम अन्नपदार्थ द्यावे. उघड्यावरचे अन्नपदार्थ देणे टाळावे.कपडे : लहान मुलांना अंगभरून कपडे परिधान करावे. त्यातून त्यांना डास, कीडे चावणार नाही. टाॅवेल, कपडे कोणाशीही शेअर करू नये.वैद्यकीय सल्ला : मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो.
श्वसनाशी संबंधित संसर्गपावसाळ्यात श्वसनाशी संबंधित संसर्ग वाढतो. साधा फ्लू ते स्वाईन फ्लूचा धोका वाढतो. मूल आजारी असेल तर त्यांना शाळेत पाठवू नये. मुलांना बालदमा, हृदयाचा त्रास असेल तर ‘फ्लू’ /स्वाइन फ्लूची लस घ्यावी. तसेच दूषित पाण्यामुळे काविळ, टायफॉईड होऊ शकतो. त्यामुळे मुलांना स्वच्छ पाणी द्यावे.- डाॅ. प्रशांत जाधव, बालरोगतज्ज्ञ