औरंगाबाद : जिल्ह्यात सिल्लोड व फुलंब्री तालुका वगळता इतर सहा तालुक्यांत अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. सिल्लोड व फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यास प्रारंभ केला आहे.रविवारपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी ते सर्वदूर नाही. फुलंब्री व सिल्लोड वगळता इतर तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत आहेत.बाबरा परिसरात पेरणी थांबलीमहिनाभराच्या विश्रांतीनंतर रविवारी रात्री पडलेल्या पावसामुळे परिसरात तब्बल ८० टक्के शेतकऱ्यांनी सोमवारी दिवसभर कपाशीची लागवड केली; परंतु सोमवारी व मंगळवारी सकाळपर्यंत पावसाचा अंदाज पाहून शेतकऱ्यांनी राहिलेली कपाशीची लागवड थांबवली, तर मका पिकाची पेरणी करण्याचे धाडसही तुरळक शेतकऱ्यांनी दाखविले. परिसरात यंदाचा हा पहिलाच जोरदार पाऊस होता, त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या शेतात चार ते पाच बोटेच ओल असल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारी लागवड करण्याचे धाडस केले नाही. मंगळवारचा दिवसही ऊन-सावलीचा गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आकाशाकडे लागले आहेत. आता दोन दिवसात पाऊस न पडल्यास लागवड केलेली कपाशी पूर्णत: वाया जाण्याचा धोका असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून काही शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीची वेळ येणार आहे. परिसरात कपाशी लागवड व मका पेरणी आता थांबविली असल्याचे चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले.ठिबकवरील कपाशीला जीवदानरविवारच्या पावसामुळे बाबरा परिसरातील ठिबकवरील कपाशीला जीवदान मिळाले आहे.बाबरा येथील शेतकरी संदीप एकनाथ बन्सोड यांनी आपल्या निधोना रस्त्यावरील शेतात ठिबकवर लावलेल्या कपाशीला पाणी कमी पडल्याने टँकरद्वारे पाणी आणून कपाशी जगविली. आता पुन्हा पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.घाटनांद्रा भागात तुरळक पाऊसघाटनांद्रा भागात आमठाणा, चारनेर, घाटनांद्रा परिसरात रात्री पावसाने सुरुवात केली. म्हणावा तसा पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने अद्याप शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली नाही. हिंदू बांधवांनी मनूदेवीस व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर जाऊन साकडे घातले आहे. या पावसाने ठिबक सिंचनवरील पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले असून, दमदार पाऊस झाल्याशिवाय शेतकरी पेरणीस सुरुवात करणार नसल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरा फुलंब्री, वडोदबाजार व बाबरा परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.फुलंब्रीत सर्वाधिक १०० मि.मी. पाऊसफुलंब्री तालुक्यात रविवारी रात्री दोन तास जोरदार पाऊस झाला. यानंतर शेतकऱ्यांनी कपाशी, अद्रक पिकाच्या लागवडीस सुरुवात केली आहे. नदी-नाल्यांना पूर आला नसला तरी पेरणीचीे घाई शेतकऱ्यांना झाली आहे. फुलंब्रीत सर्वाधिक १०० मि.मी. तर वडोदबाजार-४०, आळंद-३२, पीरबावडा मंडळात ४५ मि.मी. पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात फुलंब्रीत प्रथमच मोठा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांत उत्साह दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशीची लागवड केली होती, त्या कपाशीला या पावसाने जीवदान मिळाले आहे. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरातही शेतकरी पेरणीला लागले आहेत. गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा परिसरात मंगळवारीे सायंकाळी ६ वाजता जोरदार पाऊस झाला.
पावसाची धरसोड
By admin | Published: July 09, 2014 12:40 AM