राजेश खराडे , बीडबीड : जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. अद्यापपर्यंत झालेला रिमझिम पाऊस पिकांना लाभदायक ठरत असला तरी सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. पारंपरिक पिकांना बाजूला सारत शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला आहे. त्यामुळे तूर, उडीद, मुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. १५ जुलैपर्यंत खरीपाची पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. त्यादृष्टीने कमी प्रमाणात का होईना गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने ६ लाख ५८ हजार २०४ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना ७ लाख ८७ हजार ८६० हेक्टरावर पेरणी झाली आहे. सध्या मशागतीची कामे पूर्ण झाली असतानाच पावसाच्या हजेरीमुळे पिके फोफावली आहेत. कापूस पाने लागण्याच्या अवस्थेत आहे तर बाजरी, तूर, उडीद, मूगही वाढीला लागली असून, फुलांच्या अवस्थेत आहेत. असे असताना मात्र या पिकांना मावा, तुडतुड्या, करप्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगराईत वाढ होत आहे. पिके बहरात असतानाच रोगराईने घेरल्याने शेतकरी चिंतेत आहे. विद्यापीठाने ठरवून शिफारशीनुसार औषध फवारणी गरजेची आहे. त्याकरिता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन महत्वाचे आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या तीन वर्षापासून खरिपातील एकही उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. यंदा पावसाच्या हजेरीने पिके सुस्थितीत असली तरी रोगांपासून बचावासाठी योग्य मार्गदर्शन मिळने गरजेचे आहे. वेगवेगळ्या खतांचा वापर महत्त्वाचापाणी साठलेल्या अवस्थेत रासायनिक खताचा वापर केल्यास वाहत्या पाण्याबरोबरच खत वाया जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मशागत झालेल्या पिकांना खत घातल्यास पिके वाढीस उपयोग होणार असून, खतांमध्ये बदल केल्यास उत्पादनातही वाढ होईल, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी सांगितले.
पावसाने तारले; किडींनी मारले
By admin | Published: July 24, 2016 12:29 AM