पैठण ( औरंगाबाद ) : मंगळवारी पैठण शहरात दोन तासात १०६ मि मी पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. पैठण शहरास मंगळवारी धुवाधार पावसाने झोडपून काढल्याने शहरवासीयांची दाणादाण उडाली, शेकडो घरात व बाजारपेठेतील दुकानात पाणी घुसल्याने नागरीक व व्यापारी हतबल झाले. बुधवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाचे आगमण झाल्याने घाबरलेल्या व्यापाऱ्यांनी दुकानातील माल हलवला. नगर परिषद प्रशासनाने या बाबत तातडीने उपाय योजना करून कोंडलेल्या नाल्यांचा श्वास मोकळा करावा अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
मंगळवारी सायंकाळी ढगफुटी सदृश पावसाने पैठण शहर व परिसरास झोडपून काढले. शहरातील मुख्य नाले ओव्हर फ्लो होऊन सखल भागातील घरादारात पाणी घुसले. यात ईंदिरानगर, कावसान, सराफनगर, भाजी मार्केट, ग्रीन चौक, कहारवाडा, सराफनगर, पन्नालाल नगर, शशीविहार सह सखल भागातील घरात पाणी घुसले, यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. याच प्रमाणे बसस्थानक, शिवाजी चौक, मार्केट कमिटीसमोर, माहेश्वरी भवन, भाजी मार्केट, समाज मंदीर आदी परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी घुसले. यामुळे भर पावसात व्यापाऱ्यांना दुकानातील माल हलवावा लागला. मात्र, दुकानात पाणी घुसल्याने दुकानातील फर्निचर फुगुन काचा फुटने आदी नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचे व्यापारी सुनील रासणे यांनी सांगितले.
मंगळवारी पैठण १०६ मि मी, पिंपळळवाडी ८७ मि मी, लोहगाव ६१ मि मी, विहामांडवा ७५ या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. तर बीडकिन ३४ मि मी, ढोरकीन ५५ मि मी, बालानगर ४० मिमी, नांदर ४३ मि मी, आडूळ ४८ मि मी, व पाचोड १७ मि मी पावसाची नोंद झाली. तालुक्यात सर्वदूर पावसाने झोडपून काढल्याने नदी नाले ऐक झाले. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पीकांना फटका बसला आहे. तालुक्यात मंगळवारी ५६६ मि मी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ७५५० मि मी म्हणजे सरासरी ७७५ मि मी पाऊस झाला आहे, असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. दरम्यान पैठण तालुक्याची वार्षिक सरासरी ६५४ मि मी असून यंदा सरासरी १२१ मि मी जास्त पावसाची नोंद पैठण तालुक्यात आजच्या तारखेपर्यंत झाली आहे.