औरंगाबाद : सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी ढगफुटीसदृश धुवाधार पावसाने (Rainfall in Aurangabad ) जवळपास २० मिनिटे शहराला चांगलेच झोडपले. जोरदार वारे आणि ढगांच्या गडगडाटासह ताशी ११६.२ मि.मी. इतक्या वेगाने पाऊस बरसला. त्यामुळे अवघ्या १२ मिनिटांत तब्बल २५ मि. मी. पावसाची नोंद एमजीएम वेधशाळेत झाली.
शहरात सायंकाळी ५.२६ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही वेळातच पावसाचा जोर वाढला. पावसाबरोबर वेगाने वारे वाहत हाेते. त्यासोबतच ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाटही सुरू झाला. अशा परिस्थितीमुळे सलग दुसऱ्यादिवशी पावसाचे रौद्ररूप नागरिकांना पाहायला मिळाले. पावसामुळे अवघ्या काही अंतरावरील दृश्यही दिसेनासे झाले होते. रस्त्यावरून चारचाकी चालविताना चालकांची तारांबळ उडाली. जवळपास २० मिनिटे पाऊस सुरू होता. मात्र, सुरुवातीची १२ मिनिटे पावसाचा वेग अगदी ढगफुटीप्रमाणेच होता. यामुळेच सायंकाळी ५.२६ ते ५.३८ या १२ मिनिटांत २५ मि.मी. इतका पाऊस झाला. जवळपास २० मिनिटे बरसल्यानंतर अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता.
हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले की, ताशी १०० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्यास ढगफुटी म्हटले जाते. या १२ मिनिटांच्या वेळेत पावसाचा वेग सरासरी ११६.२ मि.मी. प्रतितास नोंदला गेला. म्हणजे हा १२ मिनिटांतील पावसाचा वेग हा ढगफुटीचाच वेग होता, असे म्हणण्यास हरकत नाही.