औरंगाबाद : विद्युत लहरींच्या साह्याने पर्जन्यमानात वाढ करण्याचे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरूशकते. आॅस्ट्रेलिया आणि ओमानसारख्या देशांमध्ये हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे पावसाचे प्रमाण सरासरी २० टक्के वाढू शकते. शिवाय विद्युत लहरी वापराच्या तंत्रज्ञानावरील खर्चही क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानापेक्षा खूपच कमी आहे, असा दावा आॅस्ट्रेलियन रेन टेक्नॉलॉजीजचे संचालक मॅट हॅण्डबरी यांनी केला. द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या वतीने ‘विद्युत लहरीच्या वापराने पर्जन्यमानात वाढ’ या विषयावर मंगळवारी मॅट हॅण्डबरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी शंकरराव नागरे, द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सचे मिलिंद पाटील आणि एस. डी. चांदसुरे यांची उपस्थिती होती. हॅण्डबरी हे विद्युत लहरी वापरून पर्जन्यमानात वाढ करण्याच्या संकल्पनेचे अभ्यासक आणि आॅस्ट्रेलियन रेन टेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. त्यांनी सादरीकरणाद्वारे ही संकल्पना, तिचे फायदे, यशस्वतीचा दर आदींविषयी सविस्तर विवेचन केले. हॅण्डबरी म्हणाले, द्रव्ययुक्त ढगांमध्ये विद्युत लहरी पसरवून आयोनाझेशनच्या क्रियेने पर्जन्यमानात वाढ करण्याचा प्रकल्प आॅस्ट्रेलियासह इतरही काही देशांमध्ये उपयुक्त ठरला आहे. या प्रयोगाच्या नोंदीनुसार तेथील पर्जन्यमानात सरासरी २० टक्के वाढ झाली. मराठवाड्यातही या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो. सध्याच्या उपलब्ध तंत्रज्ञानामध्ये हे तंत्रज्ञान सर्वात स्वस्त आहे.अशी होतेय प्रक्रिया...पावसाळ्यात बऱ्याच वेळा आकाशात ढग येतात. परंतु भूपृष्ठावरील अमैत्रीपूर्ण तापमानाच्या स्थितीमुळे हे ढग बरसत नाही. ते तसेच वाऱ्यासोबत पुढे दुसऱ्या प्रदेशात जातात. या तंत्रज्ञानात ढगांना अनुकूल स्थिती निर्माण करून हव्या त्या ठिकाणी कृत्रिमरीत्या बरसवले जाते. यासाठी द्रव्ययुक्त ढगांमध्ये विद्युत लहरी पसरविल्या जातात. विद्युत लहरी ढगांमध्ये गेल्यावर त्या ढगांशी रिअॅक्ट होतात.विद्युतलहरी तंत्रज्ञानात टॉवर उभारले जातात. धातूच्या तारांमध्ये ढगांच्या दिशेने ऊर्जा प्रवाहित केली जाते. ढगांमधील पाण्याचे बारीक बारीक थेंब एकत्र येऊन त्यांचे मोठ्या मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होते. त्यानंतर हे थेंब ढगांपासून विलग होऊन खाली बरसतात.
विद्युत लहरी वापराच्या तंत्रज्ञानामुळे वाढू शकते मराठवाड्यात पावसाचे प्रमाण
By admin | Published: June 07, 2016 11:38 PM