उस्मानाबाद : मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे गालिबनगरातील एक -दोन नव्हे, तर तब्बल पंधरा ते वीस घरांमध्ये पाणी घुसले. वारंवार हा प्रश्न मांडूनही संबंधित नगरसेवक अथवा प्रशासनाने लक्ष दिले नाही, असा आरोप करीत चाळीस ते पन्नास रहिवासी बुधवारी पालिकेत धडकले. यावेळी रहिवाशांनी अक्षरश: पश्नांचा भडीमार करीत ‘आता मतदान मागायला तर या, मग सांगू’ अशा शब्दात संताप व्यक्त केला. नगराध्यक्ष संपत डोके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देऊन गालिबनगर परिसरात जावून पाहणीही केली.शहरातील शिरीन कॉलनी, सुलतानपुरा, अभिनव इंग्लिस स्कूल रोड आणि गालिबनगर या भागातील मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अंतर्गत रस्त्यांचा पत्ता नाही. तसेच काही ठिकाणी नाल्या नाहीत. त्यामुळे सांडपणी रस्त्यावर येते. पावसाळ्यात तर प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागते. एवढेच नाही, तर काही ठिकाणी पथदिव्यांचीही सोय नसून सापांचाही वावर वाढला आहे. मागील निवडणुकीमध्ये सर्वच सर्वच उमेदवारांकडून उपरोक्त प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली होती. त्यांना निवडूनही दिले. चार ते साडेचार वर्षांचा कालावधी सरला. मात्र, आजही प्रश्न जैसे थे आहेत. जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, कोणीही लक्ष दिले नाही. असे असतानाच मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे शिरीन कॉलनी परिसरातील तब्बल १५ ते २० घरामध्ये पाणी घुसले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी थेट पालिका गाढून उपस्थित पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला. ‘निवडणुकीमध्ये आश्वासने दिली, एकही नगरसेवक गालिबनगरात फिरकला नसल्याचे सांगत आता मतदान मागायला तर या, मग सांगू’, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. त्यावर नगराध्यक्ष संपत डोके यांनी संबंधित रहिवाशांचे म्हणणे एकून घेऊन अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी शाहीद शेख, मुजाहीद शेख, इम्रन शेख, ताहेर शेख, साजीद शेख, रोहण सय्यद, सद्दाम शेख, मोहसीन सय्यद, तोफिक शेख, आरमान शेख, गनी शेख, मन्सूर खॉन, साबेर मोमीन, अमर शेख, बब्लू पठाण, जमशेर पठाण, गौस तांबोळी, आमीर शेख, सलीम शेख, अजीम मोमीन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वीस घरात घुसले पावसाचे पाणी
By admin | Published: July 28, 2016 12:32 AM