करमाड : औरंगाबाद तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून त्यावर अनेक ठिकाणी छोटे मोठे पूल देखील तयार करण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्याने जयपूर, वरुड काजी, कच्छीघाटी येथील शेकडो हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. शेतात जाणारे रस्ते बंद झाले. शिवाय करमाड - पिंप्रीराजा रोडच्या कामामुळे मंगरूळ, जडगाव शिवारात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल मार्फत पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. सध्या औरंगाबाद तालुक्यातील फेरण जळगाव, जयपूर, वरुड काजी असा अनेक गावातून समृद्धी महामार्ग जात असून त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या महामार्गावर आवश्यक ठिकाणी छोट्या मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. मान्सून पूर्व तयारी म्हणून ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूने वाहणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे, नाल्या करणे आवश्यक होते. ज्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे त्यासर्वच ठिकाणी पायाभरणी केलेल्या खोदकामाचा मुरूम, मातीची ढीगारे अस्ताव्यस्त पडलेले आहे. तर कुठे मोठं मोठे खड्डे पडलेले आहे. या परिस्थितीत शुक्रवारी व शनिवारी औरंगाबाद तालुक्यातील याच भागात अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसामुळे जयपूर, वरूडकाजी, कच्छीघाटी, शिवारात समृद्धी लगतच्या शिवरातून पाणी नैसर्गिक प्रवाहाच्या दिशेने न वाहता इतरत्र वाहिले. त्यामुळे शेकडो एकर वहीत असलेल्या शेतजमीनिला बंदिस्त असलेले अनेक वळण फुटले पीक उगवण्यासाठी आवश्यक असलेल्या मोकळ्या मातीचा थर या पाण्यामुळे वाहून गेला. शेती नापीक होण्याची नामुष्की येथील शेतकऱ्यांवर आली. शिवाय कच्छीघाटी गावच्या रोड लगतच समृद्धीचे काम सुरू असून त्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे काम नदीच्या १०० फूट बाजूला सुरू आहे. त्या ठिकाणी रोडच्या उंचीसाठी २५ फूट उंच भाराव भरण्यात आला आहे.त्यामुळे नदीच्या पात्राचा नैसर्गिक प्रवाह बदलला गेला.आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे येथील रास्ता पूर्णपणे बंद झाला. येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने समृद्धी मार्फत तात्काळ आवश्यक उपाय योजना कारून रस्ता मोकळा करून घ्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.
करमाड - पिंप्री रोडच्या कामामुळे मंगरुळ, जडगाव शिवराचे नुकसान सध्या करमाड - पिंप्रीराजा रोडचे काम सुरू असून या रोडच्या बाजूला नाल्या करण्यात आल्या नाही. मान्सूनपूर्व कामाचे नियोजन या ठिकाणी देखील करण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहिलेल्या पाण्यामुळे मंगरुळ, जडगाव शिवारातील गट नं २६३, २२६, २२९, २३०, २३८, २३९ आशा अनेक शिवारातील शेकडो एकर जमिनीवरील मातीचा थर वाहून गेला. या ठिकाणी महसूल मार्फत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जडगाव, मंगरुळ, येथील शेतकरी एकनाथ भोसले, बद्रीनाथ हिवाळे, गंगाधर भोसले, रामभाऊ चिंचोले, जनार्धन शिंदे, धनंजय भोसले आदींनी केली आहे.