वाळुज महानगर : वाळुज महानगरात प्रवाशांना थांबण्यासाठी प्रवासी निवारा शेडची व्यवस्था नाही. रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाच्या प्रशासनाने मुख्य चौकात प्रवासी निवारे उभारावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वाळूज महानगरातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची शहरात वर्दळ असते. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. एमआयडीसीने सुरुवातीला प्रवाशांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य चौकात बसथांबे उभारले होते. पण रस्ता रुंदीकरण व सुशोभिकरणात बसथांबे काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली नाही.
सध्या बजाजनगर, रांजणगाव, पंढरपूर, साऊथसिटी, गोलवाडी फाटा आदी ठिकाणी ऊन, वारा, पावसापासून बचाव व्हावा म्हणून प्रवाशांना थांबण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामगार, महिला व जेष्ठ नागरिकांना भर उन्हात रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. बहुतांश चौक अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. बºयाचदा प्रवाशांच्या बस न थांबताच पुढे निघून जात आहे. प्रवासी निवारे उभारावेत यासाठी अनेकदा नागरिक व विविध संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे.
पण संबंधित प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून बजाजनगरातील मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, मोहटादेवी मंदिर चौक, जयभवानी चौक, पंढरपूरातील तिरंगा चौक, साऊथसिटी चौक, गोलवाडी फाटा या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी प्रवाशांसाठी निवारा शेड उभारावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.