औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या वेळी उंचावलेले हात आता मदतीसाठी पुढे आल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त खंडोबाजी पाली (जि. सातारा) येथील गावकऱ्यांसाठी अन्नधान्य, साड्या, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट आणि अन्य जीवनावश्यक अशा ट्रकभर वस्तू मदत म्हणून औरंगाबादमधून रवाना करण्यात आल्या.
सातारा जिल्ह्यातील खंडोबाजी पाली गाव तीन दिवस पुराच्या पाण्याखाली होते. यामुळे या गावातील रहिवाशांचे अन्नधान्य, कपडे आणि अन्य सर्व वस्तू तसेच शेतीचे नुकसान झाले. या गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संपर्क साधून गावाला मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपासून तातडीने मदत जमा करण्यास सुरुवात केली. आज टीव्ही सेंटर येथे सर्व वस्तू जमा करून एका ट्रकमधून पाठविण्यात आल्या.
तीन दिवसांच्या कालावधीत कार्यकर्त्यांनी ९०० किलो गव्हाचे पीठ, २ हजार किलो गहू, १०० किलो चिवडा, २०० क्विंटल बाजरी, ज्वारी, एक हजार किलो तांदूळ, ५० किलो पोहे, ५० लिटर खाद्यतेल, ५० बॉक्स बिस्कीट, ३५० ब्लँकेट, ३५० साड्या, २०० नग सॅनिटायझर, नॅपकीन आदी साहित्य जमा केले. ही मदत जमा करण्यासाठी सुरेश वाकडे, अभिजीत देशमुख, सतीश वेताळ, मनोज गायके, सुनील कोटकर, अजय गंडे, रेखा वाहटुळे, योगेश औताडे, निलेश ढवळे, प्रदीप हरदे, मंगेश शिंदे, अंकत चव्हाण, विलास औताडे, संजय जाधव, गोरख औताडे, नितीन पाटील, अरुण नवले, संदीप जाधव, नंदू गरड, रोहित तरटे आदींनी पुढाकार घेतला.
कॅप्शन.. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ट्रकभर वस्तू रवाना करताना कार्यकर्ते.