औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेसाठी पुण्यावरुन औरंगाबादकडे निघाले होते. 30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन राज औरंगाबादकडे येत होते. पण, त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 7-8 गाड्या एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले. यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.
अंकुश चौधरी आणि केदार शिंदे सुखरुप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या म्हणजेच 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभा होणार आहे. आज सकाळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे औरंगाबादकडे निघाले. त्यांच्यासोबत 30 ते 40 गाड्यांच्या ताफा आहे. या ताफ्यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाड्यांचाही समावेश आहे. दरम्यान, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे सुखरूप असून, त्यांच्या मर्सिडीज गाडीचे नुकसान झाले आहे. काळजी करण्याचं कारण नसल्याचे अंकुशने लोकमतशी बोलताना सांगितले.
ताफ्याचा दुसरा अपघात
विशेष म्हणजे, आज या ताप्याचा दुसरा अपघात आहे. पुण्यावरुन येताना काही गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या. त्यानंतर आता हा अपघात झालाय. पुण्यावरुन निघाल्यानंतर या सर्व गाड्या हायवेवरुन अतिशय वेगाने येत होत्या, औरंगाबादपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असताना या गाड्यांचा अपघात झाला. समोरच्या गाड्यांनी ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाडी एकमेकांवर आदळल्या. राज ठाकरेंच्या गाडीसह अनेक गाड्या पुढे होत्या, तर काही गाड्या पाठीमागून येत होत्या.