मुंबई - मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे वाहू लागले होते. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होत असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण या सर्व चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे. मुंबईत मनसे सर्व जागांवर म्हणजेच २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मनसे-भाजप युतीसंदर्भात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे.
मुंबईसोबतच इतरही सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली भाजप-मनसे युतीची चर्चा पूर्णविरामाकडे पोहोचली आहे. तरीही राज ठाकरेंची बदललेली भूमिका, आणि भाजपची राज ठाकरेंसोबत वाढलेली जवळीक पाहता या चर्चा सातत्याने घडतात. रिपाइं (आ) चे प्रमुख आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले आज औरंगाबादेत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबाद जिल्हात अत्याचार झालेल्या दोन दलित व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट व माजी राज्यमंत्री अॅड. प्रितमकुमार शेगावकर यांचे चिरंजीव प्रशांत शेगावकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आठवले आज शहरात आले आहेत.
यावेळी, भाजप-मनसे युतीसंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मनसेचा भाजप आघाडीला कुठलाही फायदा नाही. राज ठाकरेंचा युतीला कुठलाच फायदा नाही, असे आठवले यांनी म्हटले. तसेच, राज ठाकरेंना युतीत घेण्यास रामदास आठवलेंनी विरोधच दर्शवला आहे.
शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टिका केली. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता संपविणे हे आमचे लक्ष्य असून त्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. कारण भाजप, रिपाइंसह आता शिंदे यांची खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. सतत भूमिका बदलणारे मनसेचे राज ठाकरे यांची आम्हाला गरज नाही. त्यांनी आमच्या कडे येऊ नये, असेही ते म्हणाले.
मनसे २२७ जागांवर निवडणूक लढणार
"राज ठाकरेंचे आदेश आम्हाला मिळाले असून पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सर्व २२७ जागांवर उमेदवार देईल", असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.