मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेची गेल्या 10 दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. अखेर, आज सायंकाळी 7 वाजता राज यांनी औरंगाबादेतील सांस्कृतिक मैदानात एंट्री करताच एकच जल्लोष झाला. मोठ्या संख्येने लोक सभा ऐकायला उपस्थित होते. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... म्हणत राज यांनी सभेची सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातालीच त्यांनी, जो इतिहास विसरतो त्याच्या पायाखालचा भुगोल सरकतो, असे म्हणत शिवाजी महाराजांच्या काळातील, एकनाथ महाराजांच्या काळातील ऐतिहासिक दाखले दिले. त्यानंतर, आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
मी आज शरद पवार यांच्यासाठी काही संदर्भ आणलेत, असेही राज यांनी म्हटलं. शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत, तेच मी सभेत सांगितलं. मात्र, पवारांना ते झोंबलं, लागलं. त्यानंतर लगेचच पवारांचे मंदिरातले फोटो येऊ लागले. मात्र, पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी स्वत: लोकसभेत सांगितलं होतं की माझे वडील नास्तिक आहेत, असे राज म्हणाले. माझ्या भाषणांमुळे समाजात दुही माजतेय. राज्यासाठी, देशासाठी हे बरं नव्हे, असं शरद पवार म्हणतात. राज्यात असे भेदाभेद कोणी निर्माण केले? राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर समाजात तेढ निर्माण झाली, हे मी आधीही म्हटलंय आणि आताही म्हणतोय. शरद पवार मला माझ्या आजोबांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला देतात. ती पुस्तकं मी आधीच वाचली आहेत. तुम्ही केवळ तुम्हाला हवं तितकंच आणि सोयीचं वाचू नका. मी लेखकांची जात पाहून पुस्तकं वाचत नाही. मी मुळात जातच मानत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
पवारांना हिंदू शब्दाची ॲलर्जी
शरद पवारांना हिंदू शब्दांचीच अॅलर्जी आहे, असे म्हणत महाराष्ट्रात शरद पवारांवर जातीय तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. आता पवार हे शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहेत. अठरा पगड जाती महाराष्ट्रासाठी झटत होत्या. पण, आज महाराष्ट्र जातीत सडतोय, असे म्हणत राष्ट्रवादीनेच जातीवाद पेरल्याचा घणाघात राज यांनी केला.
4 तारखेनंतर ऐकणार नाही
लाऊडस्पीकर हा नवीन विषय नाही, तो धार्मिकही विषय नाही. तो सामाजिक विषय आहे. आता 3 तारखेला त्यांचा सण आहे, त्यांच्या सणात मला विघ्न आणायचं नाही. पण, 4 तारखेनंतर मी ऐकणार नाही. माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की, 4 तारखेनंतर मंदिरांसमोर हनुमान चालिसा लावा, हवं तर पोलिसांची परवानगी घ्या. पण, जर हे भोंगे उतरले नाहीत, तर हनुमान चालिसा लावा, असे म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा औरंगाबादच्या सभेत हनुमान चालिसा आणि भोंग्यांचा मुद्दा काढला.