मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडत आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शिवसेनेसह सत्ताधारी पक्षातील इतरही पक्षाच्या नेत्यांचं या सभेकडे लक्ष लागलं आहे. मात्र, राज यांच्या बदललेल्याया भूमिकेवरुन महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यावर टिका करत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी राज ठाकरेंच्या उशिरा उठण्यावरुन बोचरी टीका केली.
"सभा सगळेच घेत असतात, परंतु आज होणारी सुपारी सभा आहे. असे सुपारीबाज नेते आले आणि झोपले. दुपारी उठायचं आणि सभा घ्यायची. दुपारपर्यंत झोपून राहतात आणि म्हणतात भोंग्याचा त्रास होतो. कमळाचं आणि भुंग्याचं नात जूनं आहे. मात्र, आता कमळाचं आणि भुंग्याचं हे नवीन नातं झालंय. हा भुंगा कमळाच्या पाकळ्या कुरतडेल.", अशा शब्दात सुभाष देसाईंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. "कोणीही काही नवे कार्यक्रम घेतायत ते पाहावं लागेल. आधी मराठी मराठी केलं, आता भोंगा भोंगा आहे. आता भोंगा आणि कमळाचं नातं झालेलं आहे. भोंगा कमळाला किती त्रास देतं हे येणाऱ्या काळात कळेल. महाराष्ट्रानं अशा अनेक सुपारी सभा पाहिल्या आहेत. त्यामुळे हा विषय आणखी किती दिवस टिकेल हे पाहण्यास जनता आणि मी उत्सुक आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हिंदुह्रदयसम्राटांची नक्कल - देसाई
सरडा रंग बदलतो तो कमी पडेल, एवढे विचार बदलले आहेत. भगवी शाल घेऊन फोटो काढले म्हणून कोणाला शिवसेना प्रमुख होता येत नाही. त्यांच्या आवाजाची आणि शाल घेण्याची नक्कल करता येईल. पण, त्यांच्या विचारांची नक्कल करता येणार नाही, अशा शब्दात देसाईंनी राज ठाकरेंवर प्रहार केला. "हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शहराला औरंगाबादपासून संभाजीनगर अशी एकप्रकारची मुक्तता दिली आहे. संभाजीनगरवासीय एकप्रकारे ती आठवण जतन करत आहेत. शिवसेनेचं येथील हिंदुत्वाचं जे नातं आहे ते अभेद्य आहे. ते पुढेही कायम राहिल यात शंका नाही," असंही देसाई यांनी म्हटलं.
सर्वांनीच बंधुभावाचं नातं जपावं - देसाई
आतापर्यंत सर्व संकटं आली त्यात पोलिसांनी प्रशासनानं चांगली कामगिरी बजावली आणि जनतेला संकटातून बाहेर येण्यास वेळोवेळी मदतही केली आहे. काळजी घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतलीये. औरंगाबादच्या शांततेला कुठेही गालबोट लागणार नाही, जनता सुज्ञ आहे, कोणीही किती चिथावणी दिली तरी आपली डोकी भडकवून घेणार नाही, याची खात्री आहे. जे बंधुभावाचं नातं कायम ठेवलंय त्याचं जतन करायचं आहे. कोण काय करतं याकडे जनता चाणक्षपणे पाहत असल्याचंही देसाई म्हणाले.
औरंगाबाद शिवसेनेचा गड आहे आणि राहणार
"बाबरी मशिद पाडल्यानंतर याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नव्हते. भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे सर्व घडत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे. बाबरी मशिद पाडण्याची जबाबदारी सर्वप्रथम शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कोण आहे हे शिवसेनेला सांगायची गरज नाही. अगोदर शिवसेना आणि भाजप यांची युती होती. राज्यात लवकरच मनसे आणि भाजपची युती पाहण्यास मिळेल. भाजपने मनसेला सुपारी देऊन ही सभा आयोजित केली आहे, मात्र आशा सुपारी सभेचा शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही. औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील यात तिळमात्र शंका नाही," असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.