औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून चार दिवस शहरात मुक्कामी असणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते शहरात हिंदुत्ववादी संघटना, एनजीओ आणि पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आगामी नियोजनाबाबत मंथन करणार आहेत. ठाकरे पहिल्यांदाच चार दिवस थांबणार आहेत.
गुरुवारी दुपारी ४ वा. महावीर चौक येथे त्यांचे शहर मनसे शाखेतर्फे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर गुलमंडी येथे त्यांचे आगमन होईल, तेथे मनसेच्या शाखेतर्फे त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर १४ रोजी ठाकरे दिवसभर सुभेदारी विश्रामगृह येथे मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यामध्ये संघटन, पालिका निवडणुका व इतर बाबींचा समावेश असेल. शनिवारी शहरातील महत्त्वाच्या हिंदुत्ववादी संघटना आणि एनजीओंसोबत काही महत्त्वाच्या मुद्यांवर बैठक होईल. तसेच इंग्रजी संस्थाचालक संघटनेच्या मेळाव्याच्या उद्घाटनास हजर राहणार आहेत. मनसेप्रमुख ठाकरे यांच्या चार दिवसांच्या दौऱ्याबाबत बुधवारी मनसेचे उपाध्यक्ष अभिजित पानसे, प्रकाश महाजन, आ.राजू पाटील, सुमित खांबेकर, जावेद शेख, सतनाम गुलाटी यांनी माहिती दिली. संभाजीनगर असे शहराचे नामकरण व्हावे, याबाबत मनसे आग्रहीराहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.