- अमेय पाठक औरंगाबाद : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यानिमित्त अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाची मागील काही वर्षातील परिस्थिती पाहिली तर नक्कीच ती समाधानकारक नाही. पक्षाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे पक्षात पुन्हा ताकद निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांनी नवी योजना आखली आहे. यानुसार मनसे 'राजदूत' नेमणार आहे. आगामी निवडणुकांत पक्षाची ध्येय धोरणे आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे हे 'राजदूत' घरोघरी पोहचवणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाची गेल्या अनेक वर्षापासून स्थिती ढासळत चालल्याची चर्चा आहे. राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटतचं नाहीत अशीही चर्चा मागील काही वर्षात सातत्याने राजकीय वर्तुळात रंगत आहे. परंतु, राज ठाकरे यांच्या आगामी काळातील महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने कदाचित या सर्व चर्चांना पूर्ण विराम बसण्याची शक्यता आहे. कारण, या सर्वच प्रकारांना आळा घालण्यासाठी राज ठाकरे यांनी आता एक नवा प्लॅन तयार केल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरे यांनी विधानसभा विभागानुसार पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट करुन बैठक घेतली. त्यानंतर राजदूत, शाखाध्यक्षांची नेमणूक करुन त्यांना पुढचा कार्यक्रम दिला. आगामी निवडणुकांत पक्षाची ध्येय धोरणे आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे 'राजदूत' घरोघरी पोहचवणार आहेत आणि यासाठी शाखाध्यक्ष देखील मदतीसाठी असणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबद निवडणुकांमध्ये हेच राजदूत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील असा विश्वास पक्षाला आहे. त्याचं रिपोर्टिंग देखील थेट राज ठाकरे यांना होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एका लढवय्या नेत्याप्रमाणे राज ठाकरे यांची कारकीर्द आजवर राहिली आहे. आजही त्यांच्या भाषणाचा मोठा चाहतावर्ग आहे.पण, भाषणासाठी त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीच मतात रुपांतर राजदूतांच्या नेमणुकीने होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजदूत तळागाळात पक्ष पोहचवतील मनसे घराघरात जायला हवी. तळागाळात पोहचायला हवी. यासाठी राजदूत काम करतील. राजदूत त्यांच्याकडे आलेले सर्व प्रश्न थेट राज ठाकरे यांच्यापर्यंत नेणार आहेत. त्यानंतर तेथून हे प्रश्न सुटण्यासाठी काम सुरु होईल.- सुहास दाशरथे, जिल्हाध्यक्ष, मनसे