औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबाद येथे ५. १५ वाजेच्या दरम्यान आगमन झाले. ढोल ताश्यांच्या पथकाने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे रवाना झाला.
राज ठाकरे दुपारी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. दरम्यान, औरंगाबादच्याजवळ घोडेगाव येथे त्यांच्या ताफ्याला अपघात झाला. यात काही गाड्यांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यानंतर ठाकरे यांचा ताफा पुढे निघाला. औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करताच त्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वाळूज येथेही राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.
क्रांती चौकात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. शेकडो कार्यकर्ते क्रांती चौकात ठाकरे यांची प्रतीक्षा करत होते. चाहत्यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या पुढे नतमस्तक झाले. फुलांची उधळण आणि ढोल ताशांचा गजरात झालेल्या जंगी स्वागतानंतर राज ठाकरे पुढे रवाना झाले. उद्या १ मे रोजी राज ठाकरे यांची मराठवाडा साहित्य मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.
सभेसाठी ३ हजार पोलीस अधिकारी तैनातमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरील सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी जवळपास ३ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी (दि. ३०) बाहेरील जिल्ह्यातून अतिरिक्त कुमक दाखल होणार आहे.