औरंगाबाद : मुंबई- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत नेण्यास अखेर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा कंदिल दिला आहे. मुंबईसाठी नव्या रेल्वेची मागणी लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे शहराची मुंबई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
औरंगाबादहून मुंबईसाठी आजघडीला जनशताब्दी, तपोवन, नंदिग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. शहरातून मुंबईला दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांची संख्या पाहता या शहरासाठी नव्या रेल्वेची मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर नांदेड ते मुंबईसाठी लवकरच नवीन रेल्वे मिळणार असल्याची घोषणा नांदेड विभागाने केली होती; परंतु एक-एक महिना उलटत आहे, तरीही मुंबईसाठी नवीन रेल्वे मिळत नाही. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या पाहणी दौऱ्यात १२ डिसेंबर २०१८ रोजी ‘दमरे’चे तत्कालीन महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसला ८ बोगी जोडून नांदेड-मुंबई रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात वर्ष उलटूनही औरंगाबादहून मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू होऊ शकली नाही. औरंगाबादकरांचा मुंबईचा प्रवास खचाखच गर्दीतून आणि वेटिंगवरच होतो. नव्या रेल्वेची महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करणे, नांदेड-मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करणे, हा रेल्वे बोर्डाचा धोरणात्मक निर्णय आहे, असे म्हणत मध्य रेल्वेने वारंवार रेल्वे बोर्डाकडेच बोट दाखविले. या रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी लोकप्रतिनिधी, रेल्वे संघटनांकडून सतत पाठपुरावा करण्यात आला. अखेर रेल्वेमंत्र्यांनी या रेल्वेच्या विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच ही रेल्वे नांदेडहून धावेल.
नव्या वर्षाचा मुहूर्तराज्यराणी एक्स्प्रेस नांदेडहून सुरू करण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही रेल्वे नांदेडहून कधी सुरू होणार, याबाबत अद्याप काही माहिती प्राप्त झालेली नाही, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.