औरंगाबाद : मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज सायंकाळी औरंगाबादेत दाखल झाले. विमानतळावर त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर विमानतळापासून हॉटेल रामापर्यंत वाहन रॅली काढण्यात आली. मनसेने विधानसभेच्या मराठवाड्यातील सर्व जागांवर उमेदवार उतरविण्याचे निश्चित केले आहे. हे उमेदवार ठरविण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे सोमवारी विभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी राज ठाकरे यांचे आज सायंकाळी ५ वाजता विमानाने औरंगाबादेत आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, उपाध्यक्ष दिलीप चितलांगे आणि शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे विमानतळाबाहेर येताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. त्यानंतर विमानतळापासून भव्य वाहन रॅली काढण्यात आली. रॅलीत अनेक मोटारसायकली आणि चारचाकी वाहने सहभागी झाली. रॅलीद्वारे राज ठाकरे हॉटेल रामामध्ये पोहोचले. तेथेही कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. हॉटेलसमोरील रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते जमलेले होते. विमानतळावर जिल्हा संपर्कप्रमुख सतीश नारकर, गजानन काळे, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, नगरसेवक राज वानखेडे, अॅड. गणेश वानखेडे, भास्कर गाडेकर, गौतम आमराव, बिपीन नाईक, जिल्हा परिषद सदस्य शैलेश क्षीरसागर, सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, शिवाजी कान्हेरे, संतोष पाटील, अरविंद धीवर, वैभव मिटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मुलगा अमितही सोबतराज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे हाही औरंगाबाद दौऱ्यावर आला आहे. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर, आ. मंगेश सांगळे, शिशिर शिंदे हेही आज विमानाने त्यांच्यासोबत आले. पक्षाचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, जिल्हा संपर्कप्रमुख सतीश नारकर, गजानन काळे हे आधीच औरंगाबादेत आलेले आहेत. मनसेच्या मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ यावेळेत शहरातील सागर लॉन येथे होणार आहेत.मुलाखतीत राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते, तसेच त्यांचा मुलगा अमित सोबत असणार आहे. मराठवाड्यातून दोनशे इच्छुक मुलाखती देणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
राज यांचे जोरदार स्वागत
By admin | Published: September 15, 2014 12:36 AM