औरंगाबाद : महापालिकेत सफाई मजूर म्हणून नोकरी मिळविण्यासाठी एका तरुणाने भन्नाट शक्कल लढविली. त्याने निवृत्तीला आलेल्या एका महिलेल्या मुलाचे नाव धारण केले. त्यासाठी तरुणाने महापालिकेला चक्क बोगस कागदपत्रे सादर केली. धक्कादायक बाब म्हणजे मागील तीन वर्षांपासून नवीन नाव धारण केलेल्या नावानेच महापालिकेत नोकरीही करीत आहे. शिवसेनेचे माजी सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, मनपात हरणाबाई अश्रुबा खाडे ही महिला सफाई मजूर म्हणून कार्यरत होती. तिला दोन मुले, दोन मुली आहेत. निवृत्तीपूर्वी तिच्या खऱ्या मुलाला नोकरी मिळायला हवी होती. राजमोहमद शेख मोहमद युनूस शेख या तरुणाने हरणाबाईचा मुलगा राजू अश्रुबा खाडे या नावाने महापालिकेला कागदपत्रे सादर केली. यामध्ये निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड आदी कागदपत्रांचा समावेश आहे. मनपाच्या आस्थापना विभागातील लिपिक संजय रगडे, तत्कालीन आस्थापना अधिकारी सी. एम. अभंग, उपायुक्त रवींद्र निकम यांनी तातडीने राजमोहमद याला लाड समितीच्या नियमानुसार नोकरीही देऊन टाकली. मागील तीन वर्षांपासून राजमोहमद महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात नोकरीही करीत आहे. महापालिकेतील सफाई मजुरांना २० वर्षांची सेवा झाल्यावर स्वेच्छा निवृत्ती घेता येते. नोकरी सोडताना मुलांना नोकरी देण्याची मुभा आहे. मुले नसतील तर रक्तातील नात्यातल्या व्यक्तीची निवड करता येते. मुले नसतील तर दत्तक पुत्राला नोकरी देता येते. राजमोहमद प्रकरणात वरील कोणत्याही नियमाचे पालन करण्यात आलेले नाही.
नोकरीसाठी राजमोहमद बनला राजू
By admin | Published: July 05, 2017 12:30 AM