लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य सरकारच्या आदेशावरून शेतक-यांच्या ताब्यात दिलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेतल्याने विद्यमान संचालकांचा प्रदीर्घ लढा संपुष्टात आला आहे. मंगळवार, ९ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कारखाना ताब्यात घेतला जाणार असून, याठिकाणी शेतक-यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.राज्य सरकारने गंगापूर सहकारी साखर कारखाना शेतक-यांना ताब्यात दिल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाकडून येणाºया हंगामात कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने जोरात हालचाली सुरू झाल्या होत्या. राज्य सरकारकडून शेतक-यांना कारखाना चालू करणे, तसेच कारखान्याला आर्थिक मदत करण्याबाबत दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंगापूर येथील नगरपालिका निवडणूक प्रचाराप्रसंगी शब्द दिला होता; मात्र महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शेतकºयांच्या मालकीचा कारखाना परत घेण्याच्या हालचाली सुरू केल्याने गंगापूर तालुक्यातील शेतकरी व कामगार पुन्हा अडचणीत आले आहेत.गेल्या ८ ते ९ वर्षांपूर्वी हा कारखाना ताब्यात घेऊन राजाराम फूडस् यांच्याशी कारखाना विक्रीचा व्यवहार केला होता. सदर खरेदी-विक्रीचा व्यवहार डी.आर.ए.टी. मुंबई न्यायालयाने रद्द केला होता. सतत ९ वर्षे कारखाना बंद पडल्याने शेतकरी व कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असून, हजारो शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. बंद कारखान्यामुळे हजारो शेतक-यांनी स्वत:चे ऊस उत्पादन घेणे बंद केले आहे. तरीही कारखाना परिक्षेत्रात गोदावरी नदीकाठची बरीच जमीन असल्याने शेतक-यांना ऊस उत्पादन घेऊनही त्यांना नाईलाजास्तव नगर जिल्ह्यातील कारखान्यांना आपला ऊस बेभाव विकावा लागत आहे.चालू अवस्थेतील कारखाना बँकेने ताब्यात घेतला होता; मात्र राज्य सहकारी बँकेने कारखाना ताब्यात घेतल्यापासून बंद ठेवल्याने कारखान्याच्या मालमत्तेची मोठी झीज झाली आहे. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्य शासनाचे घटनात्मक अधिकार वापरून हा कारखाना शेतकºयांच्या ताब्यात दिला होता; मात्र आता हा कारखाना पुन्हा बँकेच्या ताब्यात जात असल्याने शेतकरी संतप्त झाले.याबाबत शेतक-यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजता पोलीस निरीक्षक बिर्ला यांच्याकडे आत्मदहनाबाबत निवेदन दिल्याने पोलीसही चक्रावून गेले. निवेदनावर खंडू बाजीराव गवारे, सयाजी शंकर पंडित, सुधाकर गवारे, प्रताप शिवनाथ पवार, आशीर्वाद सजन रोडगे, मुरलीधर कोंडीबा गांधिले, सुरेश रंघाजी दारुंटे, कल्याण गायकवाड, नवनाथ भागीनाथ सुराशे, सोमीनाथ दंडे, आत्माराम लहुरे, मच्छिंद्र्र ठोंबरे, भारत पाचपुते आदी शेतक-यांच्या स्वाक्षºया आहेत.
गंगापूर साखर कारखान्याचा राज्य बँक आज ताबा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:56 PM