बीड : भाजपा सरकारच्या वर्षभराच्या काळात महागाई २०० टक्क्यांनी वाढली असून, दुष्काळात भर पडली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईच्या विरोधात काढलेल्या थाळीनाद आंदोलनाप्रसंगी राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर बोलत होते.अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भाजपा सत्तेवर आली आहे. परंतु जीवनावश्यक गोष्टींचे भाव वाढले आहेत. केंद्रातील मोदी सरकारला दीड वर्षाचा तर राज्यातील युती सरकारला सत्तेवर येऊन वर्ष होत आहे. या वर्षभराच्या कालावधीत महागाईने कळस गाठला आहे. ४० रूपये किलो असणारी दाळ २४० रूपयांवर जाऊन पोहचली आहे. इतर सर्व वस्तूंचे भाव दुपटीने, तिपटीने वाढले आहेत. वर्षभरातच वाढलेल्या या महागाईला भाजपा सरकारचे धोरण कारणीभूत असून या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन बिकट बनले आहे, असे डॉ. क्षीरसागर म्हणाले.महागाईचा जाब विचारून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्याच्या उद्देशाने बीड येथे राकाँ जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यशवंत उद्यान, डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात महिला थाळी व बेलणे घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यामुळे परिसर दणाणून गेला होता.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. क्षीरसागर म्हणाले, आघाडी सरकार असताना अनेक महत्वाचे चांगले निर्णय घेण्यात आले. आघाडी सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवले होते. भाजपचे सरकार आणि नेते हे व्यापाऱ्यांच्या हितांची धोरणे राबवत आहेत. त्यामुळे महागाईने कळस गाठला आहे.आंदोलनात जेष्ठ नेते मोईन मास्टर, शेख शफीक, विलास विधाते, अॅड. हेमा पिंपळे, हेमलता चांदणे, परमेश्वर सातपुते, अॅड. वर्षा दळवी, प्रिया डोईफोडे, शालिनी परदेशी, नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, उपनगराध्यक्ष नसीम इनामदार, फारूक पटेल, अॅड. महेश धांडे, बबन वडमारे, विष्णू वाघमारे, गणेश वाघमारे, नागेश तांबारे, परवीन यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)
राकाँचे थाळीनाद आंदोलन
By admin | Published: October 25, 2015 11:35 PM