औरंगाबाद : सहा महिन्यांपासून हर्सूल येथील कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणीचे काम बंद पडले आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला महसूल विभागाकडून दीड हेक्टर जागा हवी आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जागा देण्यासंदर्भात आदेश दिले तरी आजपर्यंत महापालिकेला जागा मिळाली नाही. १५० मेट्रिक टन कचराप्रक्रिया प्रकल्प फक्त जागेअभावी रखडली आहे.
हरसुल येथील कचराप्रक्रिया प्रकल्पाच्या जागेवर काही खासगी नागरिकांनी आपला दावा केला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाने तालुका भूमिअभिलेख विभागाकडून जागेची मोजणी करून घेतली. महापालिकेच्या नियोजित जागेवर अर्धवटरीत्या प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेला आणखी दीड हेक्टर जागा हवी आहे. यासंदर्भात महापालिकेने महसूल विभागाकडे प्रकल्पाला लागून असलेली जागा मागितली. महसूल विभागाकडून या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मागील काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कचराप्रक्रिया प्रकल्पाचा आढावा घेतला. हर्सुल येथील प्रकल्प रखडला अशी विचारणा त्यांच्याकडून करण्यात आली. महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सर्व हकिकत नमूद केली. केंद्रेकर यांनी जिल्हा प्रशासनाला त्वरित दीड हेक्टर जागा द्यावी, असे आदेश दिले होते. मात्र महसूल विभागाने आजपर्यंत कोणतीही कारवाई पूर्ण केलेली नाही.
सिव्हीलचा कंत्राटदार संकटात
हर्सूल येथील कचराप्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ज्या कंत्राटदारांना काम दिले आहे त्या कंत्राटदाराचे मजूर सहा महिन्यांपासून थांबलेले आहेत. कामगारांना बसून पगार द्यावा लागत आहे. कंत्राटदार काम सोडून देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.