औरंगाबाद : वाळुज परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणी व तरुणाची ओळख झाली. या ओळखीत मैत्री वाढत गेली. तरुणाने तरुणीकडून राखीही बांधून घेतली होती. त्यानंतर काही दिवसांतच तो तिच्यावर अधिकार दाखवू लागला. इतर मुलांशी बोलू नको, असा दम देऊ लागला. दोन दिवसांपूर्वी तर तुला ‘देवगिरी’च्या कशीशसारखे संपवून टाकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे हादरलेल्या तरुणीने प्राचार्यांकडे धाव घेतली. त्यानंतर दामिनी पथकाला बोलावण्यात आले. दामिनी पथकाने महाविद्यालयात जाऊन विद्यार्थिनीचे समुपदेशन करीत पोलीस ठाण्यात तिला तक्रार देण्यास घेऊन गेल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.
वाळुज परिसरात एक फार्मसी कॉलेज आहे. त्या कॉलेमध्ये अरुण आणि दिव्या (नावे बदललेली आहेत) ही २० वर्षीय तरुण-तरुणी शिक्षण घेतात. अरुणने दिव्यासोबत संबंध वाढवत तिच्याकडून काही महिन्यांपूर्वी राखी बांधून घेतली होती. राखी बांधल्यानंतर काही दिवसांतच तो तिला अनेक मुलांसोबत बोलू नको, असे सांगत होता. त्यामुळे तिला त्याचा त्रास होऊ लागला. दिव्याने अरुणला समजावून सांगितले, तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने दोन दिवसांपूर्वी तर ‘देवगिरी महाविद्यालयात जसे झाले, तसे मी तुझे करीन’, अशी धमकीच दिली. या धमकीला घाबरून दिव्याने प्राचार्यांकडे धाव घेतली.
प्राचार्यांनी दिव्याच्या वडिलांना महाविद्यालयात बोलावून घेत त्यांच्यासमोरच अरुणला समजावून सांगितले. तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने उलट प्राचार्य, उपप्राचार्य आणि दिव्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मेसेज महाविद्यालयाच्या व्हाॅट्स्अप ग्रुपला टाकला. तेव्हा प्राचार्यांनी दामिनी पथकाच्या प्रमुख सहायक निरीक्षक सुषमा पवार यांना घटनेची माहिती दिली. दामिनी पथकातील नाईक आशा गायकवाड, सुजाता खरात, चालक जारवाल यांनी तत्काळ महाविद्यालय गाठले. दामिनीचे पथक आल्याची माहिती मिळताच अरुण पळून गेला.
ठाण्यात हजर केलेदामिनी पथकाने प्राचार्यांच्या मदतीने दिव्याला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या अधिकारी उचित यांच्यासमोर हजर करत तक्रार देण्यास सांगितले. विशेष म्हणजे अरुण याने एका मुलीला अशाच प्रकारे त्रास दिल्याचे समोर आल्याची माहिती दामिनी पथकाने दिली.