- संतोष हिरेमठऔरंगाबाद : स्थळ, घाटी रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक २०, वेळ रविवार दुपारी २ वाजेची. एक डाॅक्टर वाॅर्डातील महिला रुग्णाजवळ जाताच तिच्या अश्रूंचा बांध फुटतो. किडनीची यशस्वी शस्त्रक्रिया करून आयुष्याची दोरी घट्ट करणाऱ्या या डाॅक्टरलाच भाऊ मानत आयुष्यात पहिल्यांदाच तिने राखी बांधली. तिचे नाव समिना पठाण आणि हा भाऊ म्हणजे डाॅ. सुरजित दास.
रहेमानिया काॅलनीतील रहिवासी समिना पठाण यांची ८ ऑगस्ट रोजी घाटीत शस्त्रक्रिया करून एक किडनी काढण्यात आली. किडनीच्या आजूबाजूला पस (पू) झाल्याने ही शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली. किडनी काढावी लागणार, हे जेव्हा समिना यांना कळले तेव्हा त्या प्रचंड घाबरून गेल्या. त्या शस्त्रक्रियेला सहजासहजी तयार होत नव्हत्या. शस्त्रक्रियेचा दिवस उजाडला. तरीही भीती त्यांच्या मनातून गेली नव्हती. तेव्हा डाॅ. सुरजित दास यांनी समिना यांना धीर दिला. ‘तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मला तुमचा भाऊ समजा, मी सर्व काळजी घेईल, घाबरू नका’ असे म्हणत त्यांना शस्त्रक्रियागृहात नेले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आज त्या वॉर्डात दाखल आहेत. दोन दिवसांत त्यांना सुटी देण्यात येणार आहे.
वाॅर्डातील बाजूच्या खाटेवरील रुग्णाचे नातेवाईक शनिवारी राखीपौर्णिमेविषयी बोलत होते. तेव्हा समिना पठाण यांनी आपल्यालाही एक राखी आणून देण्याची विनंती त्यांना केली. त्यांनी समिना यांना राखी आणून दिली. राखी बांधण्यासाठी समिना या रविवारी सकाळपासूनच डाॅ. दास यांची वाट पाहत होत्या. डाॅक्टर भाऊराया ऑनलाइन परीक्षेत होते. अखेर दुपारी डाॅ. दास वॉर्डात आले. तेव्हा अनावर झालेल्या भावनांना वाट करून देत समिना यांनी डाॅ. दास यांना राखी बांधली. यावेळी दोघेही क्षणभर भावुक झाले होते. हा प्रसंग पाहताना वाॅर्डातील इतरांचेही डोळे पाणावले. डाॅ. मयूर दळवी, डाॅ. अनिता कंडी, डाॅ. मुब्बशीर काझी, डाॅ. सुरेश हरबडे यांच्यासह परिचारिका, कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
भावना अनावरडाॅ. सुरजित दास हे त्रिपुरा येथील रहिवासी आहे. गेल्या तीन वर्षांपासून पदव्युत्तर शिक्षणासाठी घाटी रुग्णालयात आहेत. मला दोन बहिणी आहेत. त्यांची भेट वर्षातून एकदा होते. आज रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला आणखी एक बहिणी मिळाली, हे सांगताना डाॅ. दास यांना भावनाविवश झाले होते.