लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिक्षकांच्या बदल्यांसाठी शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी जारी केलेला शासन निर्णय रद्द करून पुढील वर्षामध्ये मे महिन्यात; परंतु सन २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणेच बदल्यांची प्रक्रिया राबविली जावी, या व इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने हा मोर्चा शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मैदानातून निघाला. तो पुढे औरंगपुरा, गुलमंडी, सिटीचौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चाचे नेतृत्व सुषमा राऊतमारे, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, मंजूषा काळे, सुनीता उबाळे, लता पठाडे, पुष्पा दौड, फारुकी, शोभा खोपडे, संगीता निकम, दीपिका एरंडे आदींनी केले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांना मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.समन्वय समितीच्या या मोर्चावर सहभागी शिक्षक संघटनांच्या दुसºया गटाचा बहिष्कार होता. त्यामुळे मोर्चात बलाढ्य संघटनांचा सहभाग असताना व सुटीचा दिवस असतानादेखील आजच्या या मोर्चाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. अतिरिक्त जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अर्धे शैक्षणिक सत्र उलटले असतानाही शिक्षकांच्या बदल्या करून शासन काय साध्य करणार आहे.२७ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णय व आॅनलाइन बदली प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, मे १८ मध्ये, परंतु सन २०१४ च्या शासन निर्णयानुसारच बदल्या केल्या जाव्यात, २३ आॅक्टोबर रोजी निवड श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात यावा, शिक्षकांना केली जाणारी आॅनलाइन कामांची सक्ती बंद करण्यात यावी, केंद्रस्तरावर संगणक परिचालकांची नेमणूक करावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, ‘एमएससीआयटी’ची अट रद्द करावी, यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शिक्षकांचा जोरदार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:39 AM