औरंगाबाद : समाजकारण, राजकारण, अध्यात्म व सहकार या सर्वच क्षेत्रांत रामकृष्ण बाबा पाटील यांनी अमीट ठसा उमटविला होता.
३ सप्टेंबर १९३६ रोजी रामकृष्ण बाबा यांचा जन्म दहेगाव, तालुका वैजापूर येथे झाला. ते जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिकले होते; परंतु राजकारणात त्यांचा कायमच दबदबा राहिला. १९७८ ते ८० या काळात ते वैजापूर पंचायत समितीचे सभापती राहिले. १९८५ ते १९९५ पर्यंत वैजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. १९९८ साली ते १२ व्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. वैजापूरच्या विनायक सहकारी साखर कारखान्याचे ते दहा वर्षे अध्यक्ष राहिले.
रामकृष्ण बाबांचा वारकरी संप्रदायाशी घनिष्ठ संबंध राहिला. ते सप्ताहवाले बाबा म्हणूनच ओळखले जायचे. ४ डिसेंबर २००० साली रामकृष्ण बाबा हे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले गेले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रादेशिक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. जिल्हा देखरेख संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. सध्याही रामकृष्ण बाबा पाटील हे या बँकेचे संचालक होते. एक प्रगतिशील शेतकरी असा त्यांचा नावलौकिक होता. रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना महत्त्वाकांक्षी योजना होती.
धाडसाने निर्णय घेणारा नेतारामकृष्ण बाबा अत्यंत धाडसाने निर्णय घेत असत व तडीस नेत असत. सर्वसामान्यांचे प्रश्न व जलसिंचनाचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर राहत असे. त्यांनी वैजापूर तालुक्यात व संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले होते. त्यांच्या रूपाने धार्मिक प्रवृत्तीचा एक नेता आपण हरवून बसलो आहोत. -भाऊसाहेब तात्या ठोंबरे, माजी अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस
शेतीशी नाळ असणारा नेता रामकृष्ण बाबा यांच्या रूपाने शेतीशी नाळ असलेला एक नेता हरपला आहे. राजकारणाशिवाय अध्यात्म या विषयाशी त्यांचे जोडले जाणारे नाव सुपरिचित आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष रामकृष्ण बाबांच्या योगदानाला स्मरून काम करील, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.-डॉ. कल्याण काळे, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस
ग्रामीण नेतृत्व हरपलेरामकृष्ण बाबा पाटील यांची नाळ ग्रामीण जीवनाशी जुळलेली होती. शेती हा त्यांचा श्वास होता. खऱ्या अर्थाने एक ग्रामीण नेतृत्व होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे बाबांना भावपूर्ण आदरांजली.-नितीन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक
धार्मिक-आध्यात्मिक अधिष्ठानरामकृष्ण बाबा हे धार्मिक-आध्यात्मिक अधिष्ठान असलेले नेते होते. दहेगाव येथे झालेल्या सप्ताहाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांनी त्याकाळी माझी नियुक्ती केली होती. त्यांनी सर्वच क्षेत्रात धडाडीने काम केले होते.-मनसुख झांबड
सिंचन क्षेत्रात भरीव योगदानरामकृष्ण उपसा जलसिंचन योजना, मन्याड, बोरदहेगाव प्रकल्पासाठी त्यांचे योगदान मोठे राहिले. सरपंच ते खासदारपदापर्यंतची त्यांची वाटचाल सर्वांना थक्क करणारी आहे. त्यांच्या रुपाने एक धर्मनिरपेक्ष नेतृत्व हरपले. -रमेश गायकवाड, जि.प. सदस्य