लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या सभेवरून प्रारंभापासूनच उलटसुलट चर्चा होत होती. ही सभा किती यशस्वी होईल, यावरून तर्कवितर्क सुरू होते. ‘एक विचार, एक मंच’चा यंदाचा प्रयोग यशस्वी होईल, असा कयास होता. तो खरा ठरला. ‘एक विचार, एक मंच’ला चांगला प्रतिसाद मिळाला, तर ‘रिपाइं ए’च्या सभेत रामदास आठवले यांच्यासह अन्य नेत्यांची भाषणे सायंकाळीच आटोपली आणि सभा संपली, असे जाहीर करून नागसेन सावदेकर यांच्या संचाचा बुद्ध व भीम गीत गायनाचा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला.दरवर्षीप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर रामदास आठवले यांची सभा आयोजित करण्यात आलेली होते. बसण्यासाठी भरपूर खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तद्वतच पोलिसांचा कडक बंदोबस्तही होता. मोठा फौजफाटा सभास्थळाच्या चहूबाजूंनी दिसून येत होता.दरवर्षी रामदास आठवले हे सभास्थळी उशिरा म्हणजे सभा संपण्याच्या अर्धा ते पाऊ ण तास आधी येतअसतात. रात्री १० वाजेच्या आत भाषण संपवायचे असते. सर्वात शेवटचे भाषण त्यांचे असायचे. यावर्षी उलटे झाले. सभेची वेळ सायंकाळी ७ वाजेची असताना ते ६ वाजताच आले. तत्पूर्वी, त्यांनी ‘अस्मितादर्श’कार डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या प्रकृतीची हॉस्पिटलमध्ये जाऊन व मधुकर चांदणे यांच्या प्रकृतीची त्यांच्या घरी जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेच्या मिल कॉर्नर येथील कार्यालयास भेट दिली. तेथे संचालक मंडळासह विजय मगरे यांंनी त्यांचे स्वागत केले.तब्बल दीड तास रामदास आठवले हे मंचावर उपस्थित होते. विमानाने लवकर परतायचे आहे या कारणावरून त्यांनी लवकर सभा आटोपली. दरम्यान, समता सैनिक दलाच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. खुर्च्यांची फेकाफेकी केली. ऐक्याबद्दलचा जाब विचारला. आठवले यांनी भाषणात, आपण ऐक्यासाठी तयार आहोत. प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायलाही तयार असल्याचे घोषित केले; पण यासाठी स्वत: बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढे यावे, असे ते म्हणाले.सभेत बाबूराव कदम, पप्पू कागदे, संजय ठोकळ, अॅड. गौतम भालेराव आदींची भाषणे झाली. नागराज गायकवाड यांनी आभार मानले. मंचावर अनिल गोंडाणे, मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर थोरात, मगरे गुरुजी आदींसह पदाधिका-यांची उपस्थिती होती. विद्यापीठ गेटलगतची एक विचार एक मंचची सभा मात्र जल्लोषात सुरू होती. तेथे तरुणाईची मोठी उपस्थिती होती.
रामदास आठवले यांच्या सभेला कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:38 AM