औरंगाबाद: परभणी सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डात कार्यरत परिचारिकेच्या पतीला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजारप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपीने औरंगाबादेत एकाला ४८ हजारात ६ रेमडेसिविर इंजेक्शन विक्री केले होते.
माधव अशोक शेळके (३०, रा. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्राने सांगितले की, गुन्हेशाखेने सोमवारी रात्री कारवाई करून रेमडेसिविर विक्री करण्यासाठी आलेल्या संदीप चवळी आणि गोपाल गांगवे या आरोपींना सापळा रचून पकडले होते. त्यांच्याकडून ६ रेमडेसिविर जप्त केले होते. चौकशीदरम्यान त्यांनी परभणी येथील शेळकेकडून हे इंजेक्शन खरेदी केल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी पुंडलिक नगर ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस हवालदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवा गायकवाड यांनी आरोपी शेळकेचा शोध सुरू केला. तेव्हा तो अटकपूर्व जामिनासाठी कारने औरंगाबादला निघाल्याची माहिती त्यांना मिळाली.
बुधवारी सकाळी तो कारने शहरात येत असताना झाल्टा फाट्यावर पोलिसांनी सापळा रचून शेळकेला अटक केली. आरोपी शेळकेची पत्नी परभणी सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत एका कोविड रुग्णालयात कार्यरत आहे. तेथे त्याचे येणे-जाणे असल्यामुळे ओळख झाली होती. ही इंजेक्शन त्याने सिविल हॉस्पिटलमधून आणल्याचे पोलिसांना सांगितले; मात्र त्याच्या परिचारिका पत्नीने रुग्णाचे रेमडेसिविर चोरून आरोपी शेळकेला दिली असावे, असा संशय पोलिसांना आहे. आरोपीने आतापर्यंत किती जणांना रेमडेसिविर विक्री केले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
==================चौकट
नातेवाइकांसाठी मागवले रेमडेसिविर... पण
आरोपी चवळीच्या नाशिक येथील साडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यासाठी रेमडेसिविर हवे होते. त्याने एका ओळखीच्या डॉक्टरच्या मदतीने शेळकेला संपर्क केला. शेळकेने दोन दिवसानंतर ४८ हजारात ६ रेमडेसिविर चवळीला विक्री केले. यापैकी ४० हजार रुपये त्याने ऑनलाइन घेतले तर उर्वरित रक्कम चवळी त्याला नंतर देणार होता. चवळीच्या साडूला नाशिक येथे रेमडेसिविर उपलब्ध झाल्याचा निरोप त्याला मिळाला. खरेदी केलेले रेमडेसिविर अंगावर पडल्याने त्याने मित्राच्या मदतीने रेमडेसिविर चौपट दराने विकण्याचा प्रयत्न केला आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे सूत्राने सांगितले.