औरंगाबाद : बीड बायपास रोडवर १०० फूट उंचीचे भव्य रामकृष्ण ध्यान मंदिर उभारण्यात आले आहे. यासाठी ४ हजार टन चनार दगड व ४०० टन संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. मराठवाड्यातील एकमेव भव्यदिव्य अशा ध्यान केंद्राचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून, १७ नोव्हेंबर रोजी लोकार्पण सोहळा होणार आहे.
कोलकात्याच्या धर्तीवर औरंगाबादेत मागील ९ वर्षांपासून ‘रामकृष्ण ध्यान मंदिर’ उभारणीचे काम सुरू आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे देश-विदेशातील उत्कृष्ट शेकडो नक्षीकामांचा संगम मंदिराच्या बांधकामात पाहावयास मिळत आहे. मन:शांतीसाठी सर्व धर्मांच्या लोकांना येथे ध्यान करता येणार आहे. मंदिराचे बांधकाम १८ हजार चौ.फु.वर करण्यात आले आहे. १५६ फूट लांबी, ७६ फूट रुंद आणि १०० फूट उंचीच्या या मंदिरासाठी वाराणसी, काशीहून ४ हजार टन चनार दगड आणण्यात आले. फिकट गुलाबी रंगाच्या दगडाने मंदिर उभारले आहे. राजस्थानमधील मकराना, अंबाजी येथून ४०० टन संगमरवर आणण्यात आले आहे, तर मध्यप्रदेशातील आशापूर येथून उच्चप्रतीचे सागवान लाकूड आणण्यात आले आहे.
स्वामी रामकृष्ण यांच्या ६ फूट उंचीच्या मूर्तीची साडेतीन फुटांच्या सिंहासनावर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आजूबाजूला स्वामी विवेकानंद व श्री शारदादेवी यांच्या प्रतिमा राहणार आहेत. मंदिरासाठी २५ कोटींचा खर्च आला आहे. या ध्यान मंदिरामुळे औरंगाबादच्याच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्याच्या वैभवात भर पडणार आहे.
देश-विदेशातून येणार भाविकरामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव स्वामी विष्णुपादानंद यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळा १६ ते १८ नोव्हेंबर २०१८ यादरम्यान साजरा करण्यात येणार आहे. स्वामी वागिशानंद महाराज यांच्या हस्ते १७ रोजी मंदिराचा लोकार्पण सोहळा व युवकांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील ५ हजार भाविक शहरात येणार आहेत.