औरंगाबाद : प्रभू श्रीरामचंद्र की जय, अयोध्यापती रामचंद्र की जय, या गगनभेदी जयघोषात हजारो रामभक्तांच्या अलोट गर्दीच्या उपस्थितीत विजयादशमीनिमित्त आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी जल्लोषात पार पडला. नवरात्रीच्या नऊ दिवसांत रामलीला कथेची समाप्ती रावणदहनाने होते. ३४ वर्षांपासून सिडकोतील एन-७ रामलीला मैदानावर उत्तर भारतसंघ रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करीत आहे. रावणदहन होताच अनेकांनी एकमेकांना आलिंगन देत विजयादशमीच्या शुभेच्छा व शमीची पाने देऊन सीमोल्लंघन केले. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून आलेल्या कारागिरांनी रावणाचा ५५ फूट पुतळा तयार केला होता.मोहंमद चाँदभाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी रावण तयार केला होता. अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांच्या आसपास पुतळा उभारण्यासाठी खर्च आल्याचे संयोजकांनी सांगितले.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ.अतुल सावे, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे, उद्योगपती आऱएलग़ुप्ता, उद्योगपती शेखर देसरडा, काशीनाथ कोकाटे, उत्तरभारत संघाचे अध्यक्ष एल.एन.शर्मा, उपाध्यक्ष बच्चूसिंह लोधी, कोषाध्यक्ष ओमीराम पटेल, सचिव विनोदकुमार दीक्षित, सी.के.दीक्षित, नामदेव बेंद्रे, प्रबंधक उदयभान डागर, गणेश जोशी, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, राजू खरे, शिवाजी दांडगे, विश्वनाथ स्वामी, प्रा.माणिकराव शिंदे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंटी दीक्षित, सी.पी.पटेल, मुकेश शर्मा, मुकेश लोधी, जगदीश राजपूत, सुर्जनसिंह, शिवसिंह ठाकूर, विजय सैनी, एस.एस.सिंह यांनी परिश्रम घेतले. ढोलताशांचा गजर...मैदानातील एका रिंगणामध्ये उत्तरमुखी रावणाचा सुमारे ५५ फूट उंचीचा पुतळा उभा होता. पुतळ्याभोवती पारंपरिक पद्धतीने रिंगण करून ढोलताशांचा गजर सुरू होता. या गजरातच श्रीराम, वानरसेनेचे आणि रावणाचे सजीव युद्ध सुरू होते. नागरिकांना २०० फूट लांब उभे करण्यात आले होते. मयूरनगर येथेही रावणदहनरामलीला मैदानावर दरवर्षी आबालवृद्धांची गर्दी वाढत असून, मैदान व परिसरात अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे मागील वर्षापासून हडकोतील मयूरनगर परिसरात रावणदहन करण्यास सुरुवात झाली आहे. शिवतेज प्रतिष्ठानने यंदाही रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मयूरनगरातील स्वामी समर्थ मैदानावर ३० फुटांचा रावण उभारण्यात आला होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता रावणदहन करण्यात आले. सिडको-हडको परिसरातील रामभक्तांची या कार्यक्रमाला आबालवृद्धांनी गर्दी केली होती. रावणदहन होताच, अनेकांनी सियाँवर रामचंद्र की जय अशा घोषणा देत, विजयादशमीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष मनोज मैठी, विशाल आहेर, अध्यक्ष राहुल तायडे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
रामलीला मैदानावर जल्लोष
By admin | Published: October 12, 2016 12:56 AM