छत्रपती संभाजीनगर : तृतीयपंथी आहे म्हणून सतत धमकावून हातवारे करुन सिग्नल, चौकात पैसे मागणे, ते न दिल्यास धमकावणाऱ्या तृतीयपंथी सुहाना उर्फ गुड्डी शेख, २७, रा. पडेगाव (गुरूचे नाव सीमा) हिच्यावर सातारा पोलिसांनी दोन वर्ष शहर व जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली आहे. तृतीयपंथीयाला हद्दपार करण्याची ही शहरातली पहिलीच वेळ आहे.
पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहानाचा तृतीयपंथीयांचा गटच शहरात नेहमीच हातवारेकरुन बळजबरीने पैसे मागण्याचे प्रकार करायचा. सुहाना गुंड, खुनशी व गुन्हेगारी प्रवृत्तीची असून गटातील सहकाऱ्यांसह ती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करायची. पैसे न दिल्यास धमकावणे, अश्लिल शिविगाळ करायची.
तिच्यावर यापूर्वी बेगमपुरा, छावणी, उस्मानपुरा व पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. परंतू नागरिक तृतीयपंथी असल्याने दुर्लक्ष करत होते. गुन्ह्यांमुळे तिच्यावर चॅप्टर केसची कारवाई देखील केली. नागरिकांची समस्या लक्षात घेता पोतदार यांनी वरिष्ठांकडे तिच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला. वरिष्ठांनी तत्काळ तो मान्य करताच उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, शिपाई सुनिल पवार यांनी तिला शनिवारी सायंकाळी हद्दपार केले.