औरंगाबाद : ‘सामूहिक जीवनाचा’ आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेब अधिक व्यापक करा’, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. अनुसूचित जाती, जमाती व बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीने रविवारी ( दि. ८ ) आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे औरंगाबाद विभागीय अध्यक्ष अशोकराव कुशेर होते.
‘बाबासाहेबांचा राष्ट्रवाद’ या मुद्यापासून बाळासाहेबांनी आपली मांडणी सुरू केली. आरएसएस सांस्कृतिक राष्ट्रवादाची भाषा करतो; पण याबाबतची मांडणी त्यांच्याकडे नाही. केवळ या शब्दाचा वापर ते करतात. संस्कृती वेगवेगळी असेल तर त्यातून आपुलकीची भावना जोपासली जात नाही. आंबेडकरवादाचा आढावा घेताना आपण महात्मा गांधी यांच्याजवळ येऊन अटकतो, असे सांगत गांधी-आंबेडकर यांच्यातील वैचारिक मतभेदांसह काही साम्यस्थळेही त्यांनी दाखवली.
उमेदवार हा प्रतिनिधी असतोबाळासाहेबांच्या आधी अध्यक्षीय समारोप करताना अशोकराव कुशेर यांनी सांगितले होते की, आगामी निवडणुकांमध्ये ंिजंकणारा उमेदवार द्या. हा धागा पकडत बाळासाहेब म्हणाले, उमेदवार जिंकणारा नसतोच. त्याला जिंकून देणारा विचार प्रवाह असतो. या प्रवाहानेच हे ठरवण्याची गरज असते. यापुढे व्यक्तिगत जीवनाचा फंडा नको. सामूहिक जीवनाचा फंडा विकसित करण्याची गरज आहे आणि सामाजिक लोकशाहीबरोबरच कौटुंबिक लोकशाहीही रुजवली गेली पाहिजे.
भीमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब काय बोलतात या उत्सुकतेपोटी भानुदास चव्हाण सभागृहात मोठी गर्दी झाली होती. अत्यंत शांततेत त्यांचे भाषण उपस्थित सारेच जण ऐकत होते. प्रारंभी, संघटनेचे सरचिटणीस टी.डी. काकडे यांनी प्रास्ताविक केले. ११७ व्या घटना दुरुस्तीवर इतर नेते कुणी बोलत नाहीत. बाळासाहेबांचं त्यावर चिंतन आहे, याकडे भीमराव सरवदे यांनी लक्ष वेधले. प्रारंभी, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बाळासाहेबांनी दीपप्रज्वलन केले. संध्या पंडागळे यांनी सूत्रसंचालन केले, तर नंदकुमार सोनवणे यांनी आभार मानले.
‘आठवणींचे पक्षी ’आवडते आत्मकथन‘दलित पँथर चळवळीच्या काळात अनेक आत्मकथने आली. त्यातील प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’ हे माझे आवडते आत्मकथन. बाकीचे आत्मकथन मला कृत्रिम वाटतात. ओढूनताणून लिहिलेली वाटतात’ असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. ते म्हणाले, व्यक्तीची प्रगती हा फंडा पँथरच्या काळात होता. तो आवश्यकही होता. त्यातूनच आत्मकथन आले. यावेळी प्रबुद्ध भारत या नावाने संघटनेतर्फे तीन लाखांच्या धनादेशाचा व ओबीसी संघटनेतर्फे २५ हजारांच्या मदतीचा स्वीकार आंबेडकर यांनी केला.