लोकमत न्यूज नेटवर्कतामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व परिसरात रानडुकरांचा उच्छाद वाढला आहे़ जळकोट व वडगाव काटी शिवारात रानडुकरानी हल्ला केल्याने दोन शेतकरी जखमी झाले़ जखमींवर सोलापूर, सोवरगाव येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत़जळकोटवाडी शिवारात हणमंत विश्वनाथ जगदाळे (वय-४८) यांची शेतजमीन आहे़ हणमंत जगदाळे हे बुधवारी रात्री शेतात झोपण्यासाठी गेले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास अचानक रानडुकराच्या कपळाने त्यांच्यावर हल्ला चढविला़ यात एका रानडुकराने जोराची धडक दिल्याने हणमंत जगदाळे हे जखमी झाले़ या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला़ त्यावेळी केशव पाटील व उत्तम फंड यांनी त्यांना उपचारासाठी तत्काळ सावरगाव येथील सरकारी रूग्णालयात दाखल केले़वडगाव काटी येथील अण्णा धावाणे (वय-२८) हे युवक शेतकरी बुधवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- जे़८७६०) तामलवाडीकडे जात होते़ त्यावेळी अचानक रानडुकराने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अण्णा धावाणे हे गंभीर जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ रानडुकराने दोन गावात दोन शेतकऱ्यांना जखमी केल्याने एकच खळबळ उडाली आहे़ सध्या खरीप पेरणीपूर्व कामे सुरू असून, शेतकरी दिवसा व रात्रपाळीने शेतात काम करीत आहेत़ वाढलेल्या रानडुकरांच्या उच्छादामुळे शेतकरी हैराण आहेत़ वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़
रानडुकरांचा हल्ला; दोन शेतकरी जखमी
By admin | Published: May 27, 2017 12:34 AM