परळी : महाशिवरात्रीनिमित्त येथे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या चरणी माथा टेकण्यासाठी सोमवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रोत्सव सुरळीत पार पडावा, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरात सुरेख मंडप व्यवस्था केली आहे. १५ फेब्रुवारीपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. मंगळवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत देवस्थान विश्वस्थ समितीतर्फे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते वैद्यनाथास रूद्राभिषेक करण्यात येणार आहे. १८ रोजी बाळू महाराज नाव्हेकर यांचे कीर्तन मंगलभुवनमध्ये होणार आहे. १९ रोजी सायंकाळी पाच वाजता वैद्यनाथाची पालखी मिरवणूक निघणार आहे. ही पालखी गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळ गल्ली येथून अंबेवेस मार्गे मंदिरात जाईल. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी बैठक व्यवस्था केली आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार अतुल जटाळे, सचिव राजेश देशमुख यांनी दिली.महाशिवरात्र महोत्सवनगर पालिकेच्यावतीने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्र महोत्सव आयोजित केला आहे. या अंतर्गत रविवारपासून खुल्या शटल बॅडमिंटन स्पर्धा सुरू आहेत.तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, फराळ वाटप, जनजागृती अभियान, कुस्त्यांची दंगल आदी कार्यक्रमांचा समावेश असल्याचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले. (वार्ताहर)वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दहशतवादविरोधी पथक निगराणीसाठी तैनात आहे. मंदिरासह परिसरात ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. त्यामुळे बारीकसारीक हालचालींवर पोलिसांचे नियंत्रण राहील. पाच पोलीस अधीक्षक, २५ अधिकारी, २५१ कर्मचारी, ५८ महिला कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक तुकडी, १२ वाहतूक पोलीस, १५ वॉकीटॉकी, १५ दुर्बिणधारी पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक नाशक पथक इतका तगडा बंदोबस्त तैनात आहे, अशी माहिती अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकमत’ला दिली.
वैद्यनाथ मंदिरात सोमवारपासूनच रांगा
By admin | Published: February 17, 2015 12:04 AM