पाचोड ( औरंगाबाद ) : सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर आडूळ गावाजवळील थापटीतांडा येथे काल मध्यरात्री धावत्या कारवर हल्ला करत जबरी दरोडा घालण्यात आला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात कारमधील एकजण ठार झाला असून दीड लाखाचा मुद्देमाल लुटण्यात आला आहे. या प्रकरणी पाचोड पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी केली असून तपास सुरु आहे.
याबाबत सपोनि महेश आंधळे यांनी सांगितले कि, एमबी पाटील कन्ट्रक्शनचे साईट इंचार्ज असलेले सिद्धलिंग रामलिंग कोरे ( ५५ ) हे आपल्या कारने (एमएच- १२-एचएल -३२५६ ) परळी येथून औरंगाबादला येत होते. औरंगाबाद येथील जाधववाडी येथील रहिवासी सुनील प्रभाकर सुरडकर ( ३७ ) हा कार चालवत होता. मध्यरात्री कार राष्ट्रीय महामार्ग- २११ वरील आडूळगावाजवळील थापटी तांडा येथे आली असता रस्त्यालगतच्या डोंगरावरून त्यांच्या कारवर अचानक दगडफेक सुरु झाली. अचानक झालेल्या दगडफेकीने कारचालक सुरडकर याने गाडी थांबवली. तेव्हा काही कळायच्या आत बाजूच्या डोंगराआड लपलेल्या तीन ते चार दरोडेखोरांनी कारवर हल्ला चढवला. कोरे व सुरडकर यांना बेदम मारहाण केली. कोरे यांच्या जवळील रोकड, मोबाईल व सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी हिसकावून नेले. यात गंभीर जखमी झालेले कोरे जागीच ठार झाले तर चालक सुरडकर गंभीर जखमी आहेत. मारहाण एवढी अमानुष होती कि घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला आहे. मृत सिद्धलिंग कोरे हे मूळ बीड जिल्ह्यातील धारूरमधील म्हातारगाव येथील रहिवासी असून एमबी पाटील कन्ट्रक्शनचे साईट इंचार्ज होते.
परिसरात नाकाबंदी घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळा जवळील परिसरात नाकाबंदी केली असून दरोडेखोरांचा कसून तपास सुरु आहे. दरम्यान पाचोड पोलीस स्थानकात रोड रॉबरी अँण्ड मर्डरचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
जखमी अवस्थेत चालक आला घाटीत मारहाणीत गंभीर जखमी झालेले कारचालक सुरडकर यांनी त्या अवस्थेत मृत कोरे यांना कारमध्ये घेऊन औरंगाबाद गाठले. येथे थेट घाटी रुग्णालयातच त्याने कार थांबवली. त्यांच्यावर येथे उपचार सुरु असून कोरे यांचा मृतदेह सुद्धा घाटी रुग्णालयातच आहे.