ऑनलाईन लोकमत
परभणी/ मानवत : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मानवत तालुक्यात सिंचन विहिरीवर काम केलेल्या ५९७ मजुरांच्या मजुरीची रक्कम तीन महिन्यापूर्वीच मंजूर झाली आहे. हि रक्कम एफटीओ अर्थात फंड ट्रान्स्फर ऑर्डर ने बँकेत वर्गही करण्यात आली आहे. मात्र, स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेल्या विलीनीकरणाने हि 'एफटीओ' अद्याप मंजूर झाली नाही. सर्व सोपस्कार पार पडूनही गेल्या तीन महिन्यापासून हि मजुरीची रक्कम बँकेत 'ऑनलाईन' अडकल्याने मजूर मात्र हतबल झाली आहेत.
मानवत तालुक्यात २०१६-१७ या वर्षात ४० सिंचन विहिरीची कामे सुरू होती, मार्च-एप्रिल मे महिन्यात करण्यात आलेल्या कामाचे मस्टर ग्राम पंचायती कडून ऑनलाईन करण्यात आले. यानंतर पंचायत समितीने मजुरांच्या मजुरीच्या सात 'एफटीओ' २४ व २५ मे ला स्टेट बँक ऑफ हैद्राबाद,मानवत शाखे कडे वर्ग केल्या. ५९७ मजुरांची हि फंड ट्रान्स्फर ऑर्डर एकूण ६ लाख ७९ हजार ८७३ रुपयांची होती. परंतु ; स्टेट बँक ऑफ हैद्राबाद चे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीनीकरण झाल्याने बँकेचा आरटीजीएस क्रमांक बदला आहे. यामुळे हे एफटीओ मंजूरी विना अडकले आहेत. बँकेत जमा केलेले जुने एफटीओ रद्द करण्यासाठी पंचायत समिती कडून १६ जून ला जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.